संघर्ष, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर मिळविले यश; ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसमोर ठेवला प्रेरणेचा आदर्श
सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील सैनिक टाकळी गावच्या कन्या तथा इलेक्ट्रॉनिक्स विषयातील सुवर्णपदक विजेत्या डॉ. पुनम जाधव-पाटील यांची कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागात असिस्टंट प्रोफेसर (कायमस्वरूपी) पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे सैनिक टाकळी गावासह संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
डॉ. पुनम या सैनिक टाकळी येथील ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉ. सिद्धू आप्पासाहेब पाटील यांच्या द्वितीय कन्या आहेत. लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार व जिज्ञासू स्वभावाच्या असलेल्या पुनम यांनी आपल्या गुणवत्तेच्या जोरावर शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांचे शालेय शिक्षण छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स विषयात पदवी शिक्षण पूर्ण केले. पुढे पदव्युत्तर शिक्षण घेत असताना त्यांनी विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक मिळविले. या यशानंतर त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रातील अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या नेट आणि सेट या दोन्ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा छाप पाडली.
शैक्षणिक पात्रतेबरोबरच त्यांना अध्यापन क्षेत्रातील तब्बल सोळा वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. अत्यंत अल्प मानधनावर अध्यापनाची सुरुवात करत त्यांनी शिक्षण क्षेत्रातील आपली साधना अखंड सुरू ठेवली. दोन ते तीन हजार रुपयांच्या मानधनापासून सुरू झालेला हा प्रवास आज कायमस्वरूपी प्राध्यापक पदापर्यंत पोहोचला आहे. त्यामागे असलेले त्यांचे अथक परिश्रम, चिकाटी, संयम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा याचेच हे फलित मानले जात आहे.
संसाराची जबाबदारी सांभाळत, अनेक आव्हानांवर मात करत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनी आणि महिलांसाठी त्यांचे यश प्रेरणादायी ठरत आहे. कठोर परिश्रम आणि गुणवत्तेच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.
डॉ. पुनम जाधव-पाटील यांच्या या यशामागे त्यांचे पती, आई-वडील, सासू-सासरे, शिक्षकवृंद तसेच संपूर्ण कुटुंबीयांचे मोलाचे पाठबळ लाभल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. सैनिक टाकळीच्या या कन्येच्या उल्लेखनीय यशाबद्दल गावकरी, नातेवाईक, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच विविध सामाजिक संस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.लीड : "दोन-तीन हजार रुपयांच्या मानधनावर अध्यापनाची सुरुवात करून विद्यापीठात सुवर्णपदक, नेट-सेट परीक्षा आणि आता कायमस्वरूपी असिस्टंट प्रोफेसरपदापर्यंतचा डॉ. पुनम जाधव-पाटील यांचा प्रवास हा जिद्द, परिश्रम आणि गुणवत्तेचा प्रेरणादायी आदर्श ठरला आहे."
