डॉ. नितीन घोरपडे यांचे नगर परिषद प्रशासनाकडे निवेदन
कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड येथील ऐतिहासिक आणि शंभर वर्षांहून अधिक परंपरा लाभलेल्या टेनिस क्लबमध्ये संस्थापक सदस्यांची तैलचित्रे पुन्हा लावण्यात यावीत, अशी मागणी डॉ. नितीन विनायकराव घोरपडे यांनी कुरुंदवाड नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना दिलेल्या निवेदनात डॉ. घोरपडे यांनी नमूद केले आहे की, कुरुंदवाड टेनिस क्लब ही शहराच्या क्रीडा इतिहासाची साक्ष देणारी पुरातन वास्तू आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वी चिंतामणी टेनिस क्लबची स्थापना करण्यात आली होती. या क्लबच्या उभारणीसाठी ज्यांनी विशेष परिश्रम घेतले, अशा संस्थापक सदस्यांची नोंद असलेली सनद आजही क्लबमध्ये उपलब्ध आहे. त्या सनदेनुसार कै. गणपतराव हिंदुराव घोरपडे आणि कै. विनायकराव हिंदुराव घोरपडे यांनी क्लबच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली होती.
डॉ. घोरपडे यांनी निवेदनात आपल्या कुटुंबाचा टेनिस क्षेत्राशी असलेला वारसाही अधोरेखित केला आहे. त्यांचे आजोबा कै. दिनकरराव विनायकराव घोरपडे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले असून ते त्या काळातील टेनिस चॅम्पियन होते. संस्थानच्या विलिनीकरणापर्यंत त्यांनी प्रशासनात महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. तसेच ते कुरुंदवाड नगर परिषदेच्या पहिल्या निवडणुकीचे मुख्य निवडणूक अधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. त्यांचे वडील कै. विनायकराव घोरपडे हे देखील तब्बल १५ वर्षे टेनिस खेळाडू म्हणून सक्रिय होते.
डॉ. घोरपडे यांनी सांगितले की, संस्थापक सदस्यांची तैलचित्रे त्यांनी स्वतःच्या खर्चाने तयार करून क्लबला दिली होती. ही चित्रे काही दिवस टेनिस क्लबमध्ये लावण्यात आली होती; मात्र नंतर ती काढून टाकण्यात आली. त्यामुळे क्लबच्या इतिहासाशी निगडित असलेल्या संस्थापकांचा सन्मान राखण्यासाठी त्यांची तैलचित्रे पुन्हा लावण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
कुरुंदवाडच्या क्रीडा, सामाजिक आणि सांस्कृतिक वारशाचा अविभाज्य भाग असलेल्या या ऐतिहासिक टेनिस क्लबमध्ये संस्थापकांचे योगदान जतन करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
