शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
येथील बुवाफन नगर, अर्जुनवाड रोड परिसरात असलेल्या यशवंत रिवाईडिंग वर्कशॉपची भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी विविध कंपन्यांच्या पाच पाणी उपसा मोटर्स चोरून नेल्या. या घटनेत सुमारे १६,५०० रुपयांच्या मुद्देमालावर चोरट्यांनी डल्ला मारला असून, शिरोळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश दिनकर माळी (वय ५२, रा. बेघर वसाहत, संभाजीनगर, शिरोळ) यांचे 'यशवंत रिवाईडिंग वर्कस' नावाचे दुकान आहे. दि. ११ जून रोजी रात्री ९:३० ते दि. १२ जून सकाळी ९:०० वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी दुकानाची भिंत फोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील फाल्कन कंपनीची ०.५ एचपीची मोटर, लक्ष्मी कंपनीची ०.५ एचपीची मोटर, तसेच ५ एचपी आणि ७.५ एचपीच्या आशीर्वाद व फाल्कन कंपनीच्या तांब्याच्या तारा व स्टेटर असलेल्या मोटर्स चोरून नेल्या आहेत.याबाबत सुरेश माळी यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल पटेल करत आहेत.
