अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
आजच्या आधुनिक आणि मोबाईलच्या गतिमान युगात इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हीच काळाची पावले ओळखून बोरगांव येथील श्री विद्यासागर शिक्षण संस्था संचलित इंग्लिश मीडियम शाळेत नूतन 'इंग्रजी नर्सरी क्लास' सुरू करण्यात आला आहे. बाल विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील ही एक सुवर्णसंधी (पर्वणी) ठरणार आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, माजी जिल्हा पंचायत सदस्य श्री. अण्णासाहेब हावले यांनी केले.
बोरगाव येथील विद्यासागर शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम शाळेत नुकतेच नर्सरी क्लास प्रारंभ महोत्सवाचे दिमाखदार आयोजन करण्यात आले होते. या वर्गांचे शानदार उद्घाटन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. अण्णासाहेब हावले व जीन वाणी महिला को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संस्थापक अध्यक्षा सौ. सुनीता अण्णासाहेब हावले या दांपत्याच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी एल.के.जी. (LKG) आणि यु.के.जी. (UKG) च्या वर्गांचे उद्घाटन करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात करण्यात आली.
प्रारंभी विद्या मातेच्या प्रतिमेस मान्यवरांच्या उपस्थितीत पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी लहान मुलांना शाळेची भीती न वाटता त्यांनी हसत-खेळत आणि आनंददायी वातावरणात शिक्षण घ्यावे, यासाठी शाळा प्रशासनाने विशेष तयारी केली होती.लहान मुलांचे मन रमावे म्हणून वर्गखोल्यांमध्ये विविध प्रकारची खेळणी ठेवण्यात आली आहेत. शाळेच्या प्रवेशद्वारावर बालमित्रांचे स्वागत करण्यासाठी आकर्षक स्वागत कमान उभारण्यात आली होती, जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
उद्घाटन प्रसंगी बोलताना सौ सुनीता अण्णासाहेब हावले म्हणाले की "बाल विद्यार्थ्यांच्या जीवन प्रवासात नर्सरी क्लास ही एक महत्त्वाची पर्वणी आहे. संस्कार आणि आधुनिक शिक्षणाची सांगड घालत आम्ही विद्यार्थ्यांचा पाया मजबूत करण्यासाठी कटिबद्ध आहोत. असे मत सौ सुनीता हावले यांनी केले.
या उद्घाटन सोहळ्यास विद्यासागर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री अण्णासाहेब हावले, सौ सुनीता हावले,प्रकाश पाटील, पंपा म्हैशाळे सर,मुख्याध्यापक राजू खिचडे,संचालक अनुज हवले, संस्थेच्या सीईओ ऐश्वर्या हावले मॅडम,रावसाब तेरदाळे, शिवप्पा माळगे ,भाऊसाहेब पाटील यांच्या सह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नवोदित चिमुरडे विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेच्या या नवीन उपक्रमाचे बोरगाव व परिसरातील नागरिक व पालक वर्गातून कौतुक केले जात आहे.
