Top News

कुरुंदवाडच्या पीएम श्री कुमार विद्यामंदिर क्रमांक ३ शाळेचे शिक्षण समितीकडून भरभरून कौतुक

 १३ नवीन वर्गखोल्यांसाठी २ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर; ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ स्पर्धेतील यशाबद्दल मुख्याध्यापकांचा सत्कार

कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

 जिल्हा परिषद कोल्हापूरच्या शिक्षण समितीने नुकतीच पीएम श्री कुमार विद्यामंदिर क्रमांक ३, कुरुंदवाड या शाळेला वार्षिक आढावा बैठकीनिमित्त भेट दिली. यावेळी शाळेचा वाढता विद्यार्थी पट, शैक्षणिक गुणवत्ता, विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शिस्तबद्ध वातावरण पाहून शिक्षण समितीच्या सदस्यांनी व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शाळेचे भरभरून कौतुक केले.

बैठकीच्या प्रारंभी मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुस्तक व गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक व सर्जनशील उपक्रमांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. एकेकाळी मर्यादित विद्यार्थीसंख्या असलेल्या या शाळेने आज लक्षणीय प्रगती साधत मोठा विद्यार्थी पट निर्माण केला आहे. शाळेच्या या यशस्वी वाटचालीमागील शिक्षकांचे समर्पित कार्य आणि मुख्याध्यापकांचे नेतृत्व याचे सर्वांनी विशेष कौतुक केले.

शाळेची वाढती विद्यार्थी संख्या लक्षात घेता उपलब्ध वर्गखोल्या अपुऱ्या पडत असल्याची बाब बैठकीत समोर आली. याची तात्काळ दखल घेत शिक्षण समितीमार्फत तब्बल २ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून १३ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये मोठी भर पडणार असून विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या वातावरणात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

यावेळी शिक्षण समितीच्या सभापती सौ. शितल यादव यांनी शाळेच्या विकासासाठी भविष्यात आवश्यक असणारा अतिरिक्त निधीही उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी समिती कायम सकारात्मक भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्य शासनाच्या प्रतिष्ठेच्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ या स्पर्धेत पीएम श्री कुमार विद्यामंदिर क्रमांक ३ ने विभागस्तरावर प्रथम क्रमांक पटकावून मोठा मान मिळविला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक रविकुमार पाटील यांचा शिक्षण समितीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच शिक्षकांनी परिधान केलेला एकसमान ड्रेस कोड, त्यांची शिस्त आणि विद्यार्थ्यांमधील सकारात्मक संस्कार हे देखील बैठकीतील चर्चेचे आणि कौतुकाचे प्रमुख विषय ठरले.

ही उच्चस्तरीय बैठक अत्यंत उत्साही आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी शिक्षण समितीच्या सभापती सौ. शितल यादव, सदस्य रेखाताई मुगडे, सानिका आवाडे, स्नेहल वेल्हाळ, उत्तरा शिंदे, शुभांगी कुंभार, अमरसिंह चव्हाण, एकनाथ पाटील आणि भगवान पाटील उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद आरोग्य समिती सदस्य प्रशांत शहापुरे यांनीही बैठकीस उपस्थिती दर्शविली.

प्रशासकीय स्तरावर प्राथमिक शिक्षणाधिकारी शेंडकर मॅडम, सुवर्णा सावंत, म्हेत्रे मॅडम, उपशिक्षणाधिकारी शशिकांत बडे, काकडे, विस्तार अधिकारी सौ. दबडे तसेच जिल्ह्यातील सर्व १२ तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, सर्व शिक्षा अभियानाचे अधिकारी व कर्मचारी आणि जिल्हा परिषदेचा अभियंता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

शिक्षण समितीने दाखविलेला विश्वास, मंजूर झालेला भरीव निधी आणि शाळेने मिळविलेली शैक्षणिक यशस्विता यामुळे कुरुंदवाड परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक, माजी विद्यार्थी आणि नागरिकांकडून शाळा व शिक्षकवृंदाचे अभिनंदन करण्यात येत आहे.

थोडे नवीन जरा जुने