Top News

खत निर्मितीच्या मशीनमध्ये हात अडकून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

 डेबॉन्स अँग्रो इंडस्ट्रीज मधील घटना

जयसिंगपूर  / शिवार न्यूज नेटवर्क :

जयसिंगपूर येथील एका खत निर्मिती उद्योगामध्ये काम करत असताना मशीनमध्ये हात अडकल्याने गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. किरण तुकाराम खंडागळे (रा. बेघर वसाहत, चिपरी, ता. शिरोळ) असे मृत कामगाराचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 10 जून 2026 रोजी सायंकाळी सुमारे 4.45 वाजण्याच्या सुमारास मनाली गार्डनच्या पाठीमागे, खामकर मळा परिसरातील डेबॉन्स अँग्रो इंडस्ट्रीज या खत निर्मिती कारखान्यात किरण खंडागळे कामावर होते. यावेळी खत तयार करण्याच्या मशीनमध्ये अडकलेली माती काढण्याचे काम सुरू असताना त्यांचा डावा हात अचानक मशीनमध्ये अडकला. या भीषण अपघातात त्यांचा हात कोपराजवळून तुटून गंभीर दुखापत झाली.

घटनेनंतर सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मृताचे नातेवाईक आदिक तुकाराम खंडागळे (वय 26) यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

या घटनेची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांनी केली असून, पुढील चौकशी महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत.

औद्योगिक क्षेत्रात घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे चिपरी परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

थोडे नवीन जरा जुने