अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामानातील बदल यामुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला असून भविष्यातील पिढ्यांना सुरक्षित व निरोगी जीवन देण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही केवळ एक दिवसाची मोहीम नसून झाडांचे संगोपन करणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन बोरगावचे नगराध्यक्ष दिगंबर कांबळे यांनी केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बोरगाव नगरपंचायत कार्यालय, आर. ए. पाटील पब्लिक स्कूल, श्री अरिहंत मराठी व कन्नड माध्यम शाळा तसेच सरकारी शाळांमध्ये विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
नगराध्यक्ष कांबळे म्हणाले, “पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करावे. पर्यावरण संरक्षण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
यावेळी नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनीही पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व विशद केले. प्लास्टिकचा वाढता वापर, पाण्याची नासाडी आणि अस्वच्छता यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाचे संस्कार अंगीकारून समाजात जनजागृती निर्माण करावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमादरम्यान आर. ए. पाटील इंग्रजी शाळेच्या वतीने प्लास्टिकमुक्त शहर, जलसंवर्धन, स्वच्छता आणि वृक्षसंवर्धन या विषयांवर नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच बोरगाव नगरपंचायत परिसरात प्रत्येक नागरिकाने वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला.
या निमित्ताने विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षणावरील घोषवाक्ये सादर केली, चित्रप्रदर्शन भरविले तसेच शहरातून जनजागृती फेरी काढून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण केली. उपस्थितांनी परिसर स्वच्छ ठेवण्याची आणि अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची शपथ घेतली.
या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष रुक्साना अफराज, सभापती प्रदीप माळी, नगरसेवक अभयकुमार मगदूम, मुख्याधिकारी एस. बी. तोडकर, तुळशीदास वसवाडे, शोभा हवले, जावेद मकानदार, भारती वसवाडे, प्रथम दर्जा सहाय्यक राहुल गुडयिनकर, द्वितीय दर्जा सहाय्यक पोपट कुरळे, आरोग्य निरीक्षक महेश नंदीकेश्वर, महसूल निरीक्षक संदीप वाईगडे, समुदाय संघटना अधिकारी एम. बी. ब्रिंगिमठ, शाळेचे प्राचार्य श्रीनिवास सर, सीईओ बाळासाहेब हावले, नगरपंचायत पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमधून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला असून नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
