अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथे एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. सदर मृत व्यक्तीचे वय अंदाजे 50 ते 55 वर्षे असून, तो एका खाजगी शैक्षणिक संस्थेच्या जागेत मृतावस्थेत आढळून आला.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीने अंगात पांढरा रंगाचा शर्ट व काळी पँट परिधान केली होती तसेच पायात चप्पल होती. गेल्या दोन दिवसांपासून संबंधित व्यक्तीचा या परिसरात वावर असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार, प्रशिक्षार्थी इरांन्ना गौडनावर तसेच सहायक पोलिस उपनिरीक्षक सरदार सनदी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह पुढील तपासासाठी पाठविण्यात आला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, सदर अज्ञात व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी सदलगा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. या व्यक्तीबाबत कोणाला काही माहिती असल्यास सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार (मो. 9480804057) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास सदलगा पोलीस करत आहेत.
