अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील आजी-माजी सैनिक संघटनेतर्फे रविवार दि. १७ मेपासून “सिटी इंडेक्स प्रीमियर लीग” डे-नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षण ठरणाऱ्या या स्पर्धेत विजेत्या संघाला ७५ हजार रुपये, उपविजेत्या संघाला ५१ हजार रुपये तर तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपयांची रोख बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
या स्पर्धा गणेशवाडी येथील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे क्रीडांगणावर डे-नाईट स्वरूपात खेळविण्यात येणार आहेत. प्रत्येक संघासाठी प्रवेश फी ७००१ रुपये ठेवण्यात आली असून प्रथम नोंदणी करणाऱ्या ४० संघांनाच सहभागाची संधी मिळणार आहे.
स्पर्धा आयपीएलच्या धर्तीवर विविध नियम व अटींनुसार आयोजित करण्यात आली आहे. प्रत्येक संघात ११ खेाडू व २ राखीव खेळाडू असे एकूण १३ खेळाडू असतील. एक खेळाडू फक्त एका संघातूनच खेळू शकणार आहे. सामने ८ षटकांचे असून डबल टेनिस बॉलवर खेळवले जाणार आहेत. सर्व सामने साखळी पद्धतीने होणार असून मैदान ३६० डिग्री स्वरूपात खेळवले जाईल.
प्रत्येक खेळाडूस आधारकार्ड बंधनकारक असून सर्व संघांनी स्वतःचा ड्रेसकोड वापरणे आवश्यक राहणार आहे. सामना बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हरचा नियम लागू करण्यात येणार आहे. स्पर्धा सकाळी ९ ते दुपारी १ आणि दुपारी ३.३० ते रात्री ११ या वेळेत पार पडतील.
संघ नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६६५५९२०९६, ९७६५७२१७८७ आणि ८६३८९८४८८१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजक समितीतर्फे करण्यात आले आहे.
