Top News

शिरगुप्पी येथे गुरुवार १४ मे रोजी अरिहंत संस्थेच्या ६२ व्या शाखेचा शुभारंभ

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात विश्वासार्ह संस्था म्हणून नावारूपास आलेल्या बोरगाव येथील श्री अरिहंत को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड मल्टीस्टेट संस्थेची ६२ वी शाखा गुरुवार दि. १४ मे रोजी कागवाड तालुक्यातील शिरगुप्पी येथे सुरू होत आहे. संस्थेच्या वाढत्या विस्तारासह २००० कोटी रुपयांच्या ठेवींकडे संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अभिनंदन पाटील यांनी दिली.

स्वर्गीय सहकाररत्न रावसाहेब पाटील दादा यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या संस्थेने अल्पावधीतच सहकार क्षेत्रात गरुडझेप घेतली आहे. सभासद, शेतकरी, व्यापारी, उद्योजक आणि ऊस उत्पादक यांच्यासाठी विविध आर्थिक योजना राबवून संस्थेने ग्रामीण भागातील आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. पारदर्शक कामकाज, विश्वासार्ह सेवा आणि सभासदाभिमुख धोरणांमुळे संस्थेवर सभासदांचा मोठा विश्वास निर्माण झाला आहे.

चेअरमन अभिनंदन पाटील म्हणाले, “संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील यांच्या विचारांचा वारसा जपत आम्ही सहकार क्षेत्र अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकरी आणि सर्वसामान्य सभासदांना वेळेत कर्जपुरवठा करून त्यांची आर्थिक उन्नती साधण्याचा आमचा प्रयत्न आहे. संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपत विकासाचे जाळे ग्रामीण भागात अधिक विस्तारत आहे.

शिरगुप्पी परिसरातील नागरिकांकडून अनेक दिवसांपासून शाखेची मागणी होत होती. त्या मागणीची दखल घेत संस्थेने येथे नवीन शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या शाखेमुळे परिसरातील ग्राहकांना बचत, कर्ज, ठेव योजना तसेच विविध आर्थिक सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत.

गुरुवार दि. १४ मे २०२६ रोजी होणाऱ्या उद्घाटन सोहळ्यास सभासद, ग्राहक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध ठेव योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही अभिनंदन पाटील यांनी केले.

यावेळी युवा नेते उत्तम पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष सतीश पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक बंकापुरे, संचालक मंडळ सदस्य तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने