Top News

सैनिक टाकळीतील “धाडस वॉरियर्स” ठरले अमर जवान चषकाचे मानकरी

सुदर्शन पाटील / शिवार न्यूज नेटवर्क :

सैनिक टाकळी येथे दरवर्षीप्रमाणे टाकळी प्रीमियर लीग अंतर्गत भव्य हाफ पीच क्रिकेट बॉल स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी हायस्कूलच्या नयनरम्य क्रीडा वातावरणात यावर्षीही डे-नाईट स्वरूपातील या स्पर्धा उत्साहात व शांततेत पार पडल्या. स्पर्धांनी प्रेक्षकांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन केले.

या स्पर्धेत एकूण आठ संघांनी सहभाग घेतला होता. काल झालेल्या अंतिम सामन्यात धाडस वॉरियर्स संघाने उत्कृष्ट खेळ करत प्रथम क्रमांक पटकावून अमर जवान चषकावर नाव कोरले. तर सोन्या बापू प्रेमी संघाने द्वितीय क्रमांक मिळवला. शाहू स्पोर्ट्स संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

स्पर्धेतील विजेत्या संघांना तसेच उत्कृष्ट खेळाडूंना आकर्षक बक्षिसे व चषक देऊन गौरविण्यात आले. विशेष म्हणजे विजेत्या संघाच्या मालकांना सायकल भेट देण्यात आली. तसेच स्पर्धेतील ८० सहभागी खेळाडूंमधून लकी ड्रॉद्वारे दिगंबर पाटील यांना सायकल भेट मिळाली.

दिवसभराची कामे आटोपल्यानंतर संध्याकाळी टाकळीकरांसाठी टाकळी प्रीमियर लीग हे मनोरंजनाचे व विरंगुळ्याचे प्रमुख साधन ठरले. मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या या स्पर्धा स्पर्धा कमिटीचे सुयोग्य नियोजन, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि ग्रामस्थांची लाभलेली साथ यामुळे यशस्वीरीत्या पार पडल्या.

विशेषतः नवनाथ पाटील, सचिन पाटील, शिवाजी गायकवाड, प्रणव गायकवाड व शिवतेज पाटील या कमिटी सदस्यांनी घेतलेल्या अहोरात्र परिश्रमांचे सैनिक टाकळीकरांकडून कौतुक होत आहे.

बक्षीस वितरण समारंभास सैनिक टाकळीचे तलाठी राहुल सनदी, गावातील विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, डॉक्टर, शिक्षक, सर्व संघांचे संघमालक तसेच स्पर्धा कमिटीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने