Top News

रुकडी येथील महात्मा गांधी विद्यालयास कर्मवीर पारितोषिक प्राप्त

हैदरअली मुजावर / शिवार न्यूज नेटवर्क :

     कर्मवीर पारितोषिक स्वीकारताना विद्यालयाचे प्राचार्य रयत शिक्षण संस्थेच्या रुकडी येथील महात्मा गांधी विद्यालयास यावर्षीचे रयत शिक्षण संस्थेतर्फे दिले जाणारे प्रतिष्ठेचे कर्मवीर पारितोषिक प्राप्त झाले. रयत शिक्षण संस्थेचे पाच प्रशासकीय विभाग आहेत. प्रत्येक प्रशासकीय विभागांमध्ये सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या शाळेस दरवर्षी संस्थेमार्फत कर्मवीर पारितोषिक दिले जाते. यावर्षीचे कर्मवीर पारितोषिक दक्षिण विभागामधील महात्मा गांधी विद्यालय रूकडी या विद्यालयास मिळाले. 9 मे रोजी सातारा येथे संपन्न झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीच्या कार्यक्रमांमध्ये संस्थेचे अध्यक्ष मा. शरदचंद्रजी पवार यांच्या उपस्थितीमध्ये माजी मंत्री श्री. दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सदर पुरस्कार विद्यालयास प्राप्त झाला. 

     याप्रसंगी मा. खासदार सुप्रिया सुळे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. चंद्रकांत दळवी, सचिव मा. विकास देशमुख, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य मा.आ.डॉ. विश्वजित कदम, आ.रोहित पवार, व्यवस्थापकीय मंडळाचे सदस्य मा.जे.के. जाधव (बापू), मा.श्री. अजित पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.एम.बी.शेख, संस्थेचे जनरल बॉडी सदस्य मा. विक्रांत पाटील व मा. सरोज पाटील (माई), संस्थेचे लाईफ मेंबर मा.श्री.धनंजय बकरे, विभागीय अधिकारी श्री. अशोक शिंदे, सहाय्यक विभागीय अधिकारी मा.श्री. ऍथोनी डिसोजा, यु.बी. वाळवेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सदर पुरस्कारासाठी शाळेचे विभागीय स्तरावरून व संस्था स्तरावरून असे द्विस्तरीय मूल्यांकन करण्यात आले होते. रुकडी येथील महात्मा गांधी विद्यालय गेल्या अनेक वर्षांपासून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यामध्ये अग्रेसर असून विद्यालयाचे मुख्याध्यापक मा.आर.डी. माने, उपमुख्याध्यापक व संस्थेचे नूतन मॅनेजिंग कौन्सिल सदस्य मा. जयराम पाटील व पर्यवेक्षक श्री. वजरीणकर एस.व्ही. यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाची घोडदौड सुरु असून रयत शिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आलेल्या कर्मवीर पुरस्कारामुळे विद्यालयच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. विद्यालयच्या यशामुळे स्थानिक स्कुल कमिटी तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थांमधून विद्यालयाचे अभिनंदन होत आहे.

थोडे नवीन जरा जुने