Top News

आदमापूर यात्रेसाठी प्रशासन सज्ज; जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची पाहणी

 


आमदापूर / शिवार न्यूज नेटवर्क : 

     आदमापूर येथील आगामी श्री बाळूमामा अमावास्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी श्री क्षेत्र आदमापूर येथे भेट देत यात्रा व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेतला.लाखो भाविक उपस्थित राहणाऱ्या या यात्रेसाठी सुरक्षा, वाहतूक व नियोजन व्यवस्थेची तयारी अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली.यावेळी बाळूमामा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांनी पोलीस अधीक्षकांचे स्वागत केले.श्री बाळूमामा देवस्थान परिसरातील विविध सुविधा, भाविकांसाठी करण्यात आलेल्या व्यवस्था तसेच सुरक्षेच्या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली.पोलीस अधीक्षकांनी वाघापूर फाटा येथील वाहतूक नियंत्रण व्यवस्था, देवस्थान परिसरातील पार्किंग सुविधा, मंदिरातील दर्शन रांग व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणासाठी आखण्यात आलेल्या नियोजनाची माहिती घेतली.यात्रेदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने सतर्क राहून प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

      जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या यात्रांपैकी एक असलेल्या आदमापूर यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ते प्रथमच आदमापूर येथे आले होते.यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या पाहणी दौऱ्यात भुदरगड तालुका पोलीस उपनिरीक्षक गोरख चौधर,मुरगूड पोलीस उपनिरीक्षक क्रांती पाटील तसेच पोलीस उपनिरीक्षक आप्पासो पोवार उपस्थित होते.यावेळी देवस्थानचे अध्यक्ष धैर्यशील भोसले व विश्वस्त दिलीप पाटील यांनी यात्रा व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती देत प्रशासनाशी समन्वयाने काम सुरू असल्याचे सांगितले.

थोडे नवीन जरा जुने