Top News

सातबारावर नाव नोंद करण्यासाठी ६० हजारांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील नांदणी येथील मंडळ अधिकारी आणि एका खाजगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे. कोर्टाच्या हुकूमनाम्यानुसार सातबारावर नाव नोंद करून देण्यासाठी तब्बल १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. तडजोडीनंतर ६० हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले.

याबाबत एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमितकुमार जगन्नाथ पाडळकर (वय ४४), मंडळ अधिकारी, नृसिंहवाडी तथा अतिरिक्त कार्यभार नांदणी, ता. शिरोळ आणि शिवाजी आनंदराव जाधव (वय ६१, रा. जाधव मळा, धरणगुत्ती) या खाजगी व्यक्तीविरोधात कारवाई करण्यात आली आहे.


तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली होती. कोर्टाच्या आदेशानुसार सातबारावर नाव नोंद करण्याच्या कामासाठी आरोपींकडून १ लाख २५ हजार रुपयांची लाच मागण्यात येत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

तक्रारीची पडताळणी १८ मे रोजी पंचासमक्ष करण्यात आली. त्यावेळी मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर व शिवाजी जाधव यांनी स्वतःसाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ६० हजार रुपये देण्याचे ठरले होते.

यानंतर एसीबीने सापळा रचला. आरोपी मंडळ अधिकारी पाडळकर यांनी तक्रारदारास लाचेची रक्कम शिवाजी जाधव यांच्याकडे देण्यास सांगितले. तक्रारदाराने ६० हजार रुपये दिल्यानंतर एसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाई करत शिवाजी जाधव यांना लाच रकमेसह ताब्यात घेतले. तसेच मंडळ अधिकारी अमितकुमार पाडळकर यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरोळ पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ७ व ७ अ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तर पुढील तपास पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील करत आहेत.

थोडे नवीन जरा जुने