Top News

शिरोळ तालुक्यात भाजीपाला पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वाढता वापर

 तण नियंत्रण, ओलावा टिकवणे व तापमान नियंत्रणासह विविध फायदे

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ तालुक्यातील शेतकरी आता आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती करण्याकडे वळताना दिसत आहेत. विशेषतः मे महिन्यात टोमॅटो, दोडका, काकडी आदी फळभाजी पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जात असून यासाठी मल्चिंग पेपरचा वापर वाढला आहे. आधुनिक शेती पद्धतीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी या पद्धतीला पसंती देत आहेत.

मल्चिंग पेपरमुळे तण नियंत्रण, जमिनीतील ओलावा टिकवणे तसेच तापमान नियंत्रण करणे सोपे होते. त्यामुळे पिकांची वाढ चांगली होऊन उत्पादनात भरघोस वाढ होत असल्याचे शेतकरी सांगतात. सध्या तालुक्यात बहुतांश शेतकरी मल्चिंग पेपरचा वापर करून भाजीपाला लागवड करताना दिसत आहेत.

मल्चिंग पेपरचे प्रामुख्याने दोन प्रकार वापरले जातात. काळी-काळी मल्चिंग पेपर आणि सिल्व्हर-काळी मल्चिंग पेपर. काळी-काळी मल्चिंग पेपर तण नियंत्रण आणि ओलावा टिकवण्यासाठी उपयुक्त ठरते. तर सिल्व्हर-काळी मल्चिंग पेपरमध्ये चांदीची बाजू वरच्या दिशेला आणि काळी बाजू जमिनीकडे ठेवली जाते. चांदीची बाजू सूर्यप्रकाश परावर्तित करण्यास मदत करते. त्यामुळे पांढरी माशी यांसारख्या कीटकांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.

मल्चिंग पेपरसोबत ठिबक सिंचनाचा वापर अधिक फायदेशीर मानला जातो. मल्चिंग पेपरसाठी प्रतिएकर साधारणतः ८ ते १२ हजार रुपये खर्च येतो. मात्र त्याचे फायदेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे कृषी तज्ज्ञ सांगतात.

मल्चिंग आच्छादनामुळे जमिनीला थेट सूर्यप्रकाश मिळत नाही. परिणामी तणांची वाढ कमी होते. तसेच मातीचे बाष्पीभवन कमी झाल्याने जमिनीत ओलावा टिकून राहतो आणि उन्हाळ्यात पाण्याची बचत होते. पिकांच्या गरजेनुसार जमिनीचे तापमान नियंत्रित राहिल्याने मुळांची वाढ चांगली होते. पिकांना दिलेली खते वाहून जात नाहीत. मल्चिंग पेपरखालील माती भुसभुशीत आणि मोकळी राहिल्यामुळे मुळाभोवती हवेशीरपणा वाढतो.

फळे आणि भाजीपाला मातीच्या थेट संपर्कात येत नसल्याने ती खराब होत नाहीत व अधिक टवटवीत राहतात. तसेच आंतरमशागत करताना पिकांच्या मुळांना धक्का लागत नसल्याने पिकांची वाढ अधिक चांगली होते.

मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी शेतात चांगले कुजलेले शेणखत तसेच माती परीक्षणानुसार आवश्यक रासायनिक आणि सेंद्रिय खतांची मात्रा मिसळली जाते. त्यानंतर पिकांच्या आवश्यकतेनुसार गादी वाफे तयार केले जातात. मल्चिंग पेपर अंथरण्यापूर्वी ठिबक सिंचनाच्या पाइपलाइन टाकल्या जातात. त्यानंतर पेपरच्या दोन्ही बाजू मातीमध्ये घट्ट गाडल्या जातात. मल्चिंग पेपरवर ठरावीक अंतरावर गरम ग्लासच्या सहाय्याने गोल छिद्रे पाडून त्यामध्ये रोपांची लागवड केली जाते.

काही शेतकरी मल्चिंग पेपर अंथरण्यासाठी ट्रॅक्टरचलित मल्च लेइंग यंत्राचाही वापर करत आहेत. या यंत्रामुळे वेळ, मजुरी खर्च आणि श्रमांची बचत होऊन मल्चिंग पेपर अधिक चांगल्या प्रकारे अंथरला जातो.


मल्चिंग पेपरसाठी शासनाचे ५० टक्के अनुदान

मल्चिंग पेपर वापरणाऱ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून ५० टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. या योजनेची माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी शेतकऱ्यांनी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर माहिती घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

थोडे नवीन जरा जुने