अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
चिकोडी तालुक्यातील इंगळी येथे खेळताना विजेचा धक्का बसून घराच्या छतावरून खाली पडल्याने ९ वर्षीय बालिकेचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी सानवी कांबळे ही इंगळी प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिक्षण घेत होती. मंगळवारी सायंकाळी ती घराच्या छतावर खेळत असताना तिला अचानक विजेचा शॉक बसला. त्यामुळे ती तोल जाऊन छतावरून खाली कोसळली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली.
जखमी अवस्थेतील सानवी कांबळे हिला तात्काळ जवळच्या दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची नोंद अंकली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक व पोलीस अधिकारी करीत आहेत. सानवी ही मनमोकळ्या स्वभावाची, हसतमुख आणि सर्वांशी मिळून मिसळून वागणारी मुलगी होती. तिच्या अकाली निधनामुळे इंगळी परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
