Top News

पंचगंगा नदी प्रदूषणप्रश्नी आमदार यड्रावकर यांना निवेदन

 


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क : 

पंचगंगा नदीचे वाढते प्रदूषण, नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी आणि रासायनिकयुक्त पाण्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीबाबत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना निवेदन देण्यात आले. पंचायत समितीचे सभापती मिलिंद कुरणे व माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले.

यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न अत्यंत गंभीर असून याबाबत पर्यावरण मंत्री नामदार पंकजा मुंडे यांची भेट घेऊन या प्रश्नाची तीव्रता त्यांच्या निदर्शनास आणून देणार असल्याचे सांगितले. तसेच येणाऱ्या अधिवेशनात पंचगंगा प्रदूषणाबाबत लक्षवेधी मांडून सरकारचे लक्ष वेधणार असून तातडीने उपाययोजना करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवेदनात म्हटले आहे की, पंचगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात सांडपाणी व केमिकलयुक्त पाण्यामुळे दूषित झाले असून हे पाणी आता पिण्यासाठीच नव्हे तर शेतीसाठीसुद्धा अयोग्य ठरत आहे. त्यामुळे या गंभीर प्रश्नाकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन कोणत्याही घटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

तसेच पंचगंगेचे पाणी सतत वाहते ठेवावे, गावागावांत तसेच शहरी भागात एसटीपी प्लँट उभारण्यासाठी शासनाने निधी व जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली. नदीकाठावरील पाणी उपसा करणारे शेतकरी व पाणीपुरवठा संस्थांना दूषित पाणी उपसा करावे लागत असल्याने त्यांचे वीजबिल तसेच पाटबंधारे विभागाकडून आकारला जाणारा उपसा कर माफ करावा, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी हेरवाडच्या सरपंच रेखा जाधव, बंडू बरगाले, विश्वास बालिघाटे संतोष चिंदरकर, अमित कागले, आदिनाथ आरबाळे, संदीप बिंदगे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने