अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
जयपुर येथील श्री अरिहंत साखर कारखान्याने आपल्या उत्कृष्ट तांत्रिक कामगिरीच्या जोरावर कर्नाटक सरकारचा अत्युत्तम तांत्रिक साखर कारखाना हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे, कारखान्याने राज्याच्या साखर उद्योगात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बेळगाव येथील एस निजलिंगप्पा शुगर इन्स्टिट्यूट तर्फे साखर मंत्री शिवानंद पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.राज्यातील खाजगी साखर कारखान्यातील पुरस्कारासाठी जैनापूर येथील श्री अरिहंत शुगरची एकमेव निवड झाल्याने कारखान्याच्या कार्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी साखर मंत्री शिवानंद पाटील म्हणाले की श्री अरिहंत शुगर ने आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि कार्यक्षम व्यवस्थापन निर्माण केले आहे, त्यामुळे कारखाना इतरांसाठी आदर्श ठरला आहे. कारखान्याने ऊस गाळप, साखर उत्पादन, ऊर्जा बचत, पर्यावरण पूरक उपक्रमामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान,यंत्रसामग्रीचा वापर उत्पादनातील प्रक्रियेतील पारदर्शकता जपण्याचे कार्य श्री अरिहंत शुगर च्या माध्यमातून झालेले आहे .
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष, निपाणी विभाग चे युवा नेते उत्तम पाटील म्हणाले की या पुरस्कारामुळे कारखान्याच्या कार्याला नवे बळ मिळणार असून भविष्यातही अशीच प्रगती कायम राखण्याचा श्री अरिहंत परिवाराचा मानस आहे.
बोरगाव येथील श्री अरिहंत उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय रावसाहेब पाटील दादा यांनी शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी जैनापूर येथे साखर कारखाना सुरू केला आहे.आज श्री अभिनंदन पाटील यांच्या प्रेरणेतून हा साखर कारखाना राज्यातील एक आदर्श ठरला आहे. या पुरस्कारांमध्ये शेतकरी वर्ग ,कर्मचारी यांचा मोलाचा वाटा असल्याचे मत कारखान्याचे मुख्य कार्यनिर्वाहक श्री अभिनंदन पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास जमखंडी चे आमदार जगदीश गुडगुंठी, ऊस आयुक्त गोविंद रेड्डी ,संचालक गोपाल राजू, रामण्णा कट्टी, कारखान्याचे सीईओ महावीर पाटील, एच आर सचिन हंसनाळे, अण्णासाहेब केसते यांच्यासह विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
