अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवेचा भोंगळ कारभार जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापूरे यांच्या अचानक पाहणीत उघड झाला. पाहणीदरम्यान वैद्यकीय अधिकारी डॉ. जयपालसिंग हे दुपारच्या वेळेत कक्षात झोपलेल्या अवस्थेत आढळल्याचा दावा शहापूरे यांनी केला. तसेच उपकेंद्रातील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) कर्मचाऱ्यांकडून रुग्ण तपासणी करून घेतली जात असल्याचेही निदर्शनास आले.
आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही सुविधा नसल्याचे समोर आले. औषधे दिल्यानंतर “पाणी घरी जाऊन प्या” असे सांगितले जात असल्याने रुग्णांमधून संताप व्यक्त होत आहे. केंद्रात डॉक्टर, उपचार सुविधा, आपत्कालीन सेवा यांची माहिती दर्शविणारा फलक नसल्याचेही आढळले. नोंदवही व अभिलेख अद्ययावत नसल्याबाबतही गंभीर तक्रारी समोर आल्या.
बाहेरील राज्यातील डॉक्टरांना मराठी भाषा अवगत नसल्याने ग्रामीण रुग्णांना संवाद साधताना अडचणी येत असल्याचे शहापूरे यांनी सांगितले. गंभीर रुग्णांना रुग्णवाहिका नाकारली जात असल्याचाही आरोप करण्यात आला. औषध विभागाच्या किल्लीसंदर्भातील निष्काळजीपणामुळे औषध वितरण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी कवठेगुलंद माळभागातील राजेंद्र बाळू लोंढे (वय ५७) यांची प्रकृती अचानक बिघडली होती. कुटुंबीय व ग्रामपंचायत सदस्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रुग्णवाहिकेची मागणी केली. मात्र डॉक्टरांनी “१०८ वर फोन करा” असे सांगितल्याचा आरोप आहे. दोन तास उशिराने रुग्णवाहिका पोहोचली; मात्र उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. वेळेत रुग्णवाहिका मिळाली असती तर जीव वाचला असता, अशी लेखी तक्रार कुटुंबीयांनी शहापूरे यांच्याकडे दिली आहे.
रुग्णनोंदणी रजिस्टरमध्ये क्रमवारीत रिकाम्या जागा ठेवण्यात येत असल्याने बोगस रुग्णनोंदी केल्या जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी केंद्रात आठ जागांची नोकरभरती करण्यात आली. जिल्हा परिषदेकडून भरती प्रक्रियेला स्थगिती असताना ही भरती कशी करण्यात आली, याची चौकशी सुरू असल्याचे प्रशांत शहापूरे यांनी सांगितले.
यावेळी प्रमोद भेंडवडे, राहुल नरके व सागर बंडगर यांच्यासह शहापूरे यांनी केंद्राची पाहणी केली. घटनेची गंभीर दखल घेत तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खटावकर व पंचायत समिती सभापती मिलिंद कुरणे यांना तातडीने बोलावण्यात आले. सभापती कुरणे यांनीही अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावत कठोर कारवाईचे संकेत दिले.
“कवठेगुलंद प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणा गंभीर आहे. रुग्णांच्या सुविधांकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार आहे.”
— प्रशांत शहापूरे, आलास जिल्हा परिषद सदस्य
