इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
आंतरराष्ट्रीय तणावाचे कारण पुढे करत मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलची भरमसाठ दरवाढ केल्याच्या निषेधार्थ दत्तवाड येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. 'मोदी सरकार हाय हाय', 'इंधन दरवाढ कमी झालीच पाहिजे' अशा घोषणांनी गांधी चौक परिसर दणाणून गेला होता. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारच्या धोरणांचा जाहीर निषेध केला.
कच्चे तेल स्वस्त, तरीही जनतेची लूट असे आरोप करत आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर असतानाही, देशातील जनतेकडून चढ्या दराने कर वसुली केली जात आहे. मोदी सरकार आर्थिक पातळीवर पूर्णपणे अपयशी ठरले असून, यामुळे देशातील महागाई गगनाला भिडली आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर तातडीने कमी करावेत, अन्यथा जनतेच्या संतापाचा तीव्र भडका उडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दत्तवाड येथे इंधन दरवाढीविरोधात झालेल्या आंदोलनात काँग्रेसचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यामध्ये जिल्हा कॉंग्रेस सरचिटणीस उदय काकासो पाटील, शिरोळ तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमित माने शिरोळ तालुका महिला काँग्रेस उपाध्यक्षा गायत्री कुरुंदवाडे, दत्तवाड ग्रामविकास सोसायटीचे चेअरमन मलगोंडा सुळकुडे, सौ.राधा उदय पाटील
पतसंस्थेचे चेअरमन सुरेश पाटील, एन.एस.पाटील, युवराज घोरपडे, अॅड. सुरेश पाटील, बसगोंडा पाटील, आण्णाप्पा कुरुंदवाडे यांच्यासह स्थानिक विकास संस्थांचे पदाधिकारी आणि राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. केंद्र सरकारने सर्वसामान्यांची लूट थांबवून तात्काळ दिलासा न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.
