घोसरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
महेश मानव सेवा संस्थेच्या वतीने शनि अमावस्या व शनि जयंतीनिमित्त घोसरवाड येथील जानकी वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी शिबिर, औषध वितरण, खाद्यपदार्थ तसेच नवीन कपड्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
जानकी वृद्धाश्रमामध्ये ७० वर्षांवरील सुमारे ३० लाभार्थी तसेच १० सेवेकरी असून, त्यांना वेळेवर आरोग्य सुविधा मिळण्यात अडचणी येत होत्या. ही गरज ओळखून महेश मानव सेवा संस्थेने पुढाकार घेत वृद्धाश्रमात आरोग्य सेवा पोहोचवली.
शिबिराच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी म्हणजेच दि. १४ मे २०२६ रोजी सर्व लाभार्थ्यांची प्राथमिक रक्त तपासणी करण्यात आली होती. त्या अहवालाच्या आधारे डॉक्टरांच्या पथकाने प्रत्येकाची स्वतंत्र फाईल तयार करून आवश्यक औषधांचे किट बनवले. त्यानंतर आज प्रत्यक्ष वृद्धाश्रमात जाऊन डॉक्टरांनी सर्वांची आरोग्य तपासणी केली. यावेळी ज्येष्ठ नागरिकांना योग्य आरोग्य सल्ला देण्यात आला तसेच आवश्यक ती मोफत औषधे संस्थेच्या सदस्यांकडून वितरित करण्यात आली.
या प्रसंगी संस्थेचे संस्थापक बाबासाहेब पुजारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तसेच समाजसेवा हीच खरी ईश्वरसेवा असल्याची भावना व्यक्त करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास जानकी वृद्धाश्रमाचे सदस्य प्राचार्य डॉ. संभाजी गावडे, रोहन हुलवान, विश्वनाथ पुजारी, जानकी पुजारी आदी उपस्थित होते.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी शिवभगवान तोषणीवाल, घनश्याम तोतला, रामगोपाल मालानी, कमलकिशोर भराडिया, ओमप्रकाश पोतदार, रामगोपाल माहेश्वरी, सुशील इनाणी व श्रेयांश तोतला यांनी विशेष परिश्रम घेतले. उपस्थितांकडून या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.
