Top News

ढोणेवाडी तलावातील बेकायदेशीर गौण खनिज उत्खनन प्रकरण; लोकायुक्त चौकशीचे आदेश, पंचनामा पूर्ण

अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क : 

निपाणी तालुक्यातील ढोणेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील तलावातील गौण खनिज उत्खनन प्रकरणी गंभीर आरोप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत लोकायुक्तकडून चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे.

ढोणेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील सर्वे क्रमांक ३९६ मधील सुमारे २ एकर ९ गुंठे क्षेत्रफळाच्या तलावातील मुरूम, माती व दगड बेकायदेशीररित्या उपसा करून लाखो रुपयांचा गैरव्यवहार केल्याची तक्रार गुंडू खोत व राजू भदरगडे (रा. बोरगाववाडी) यांनी बेंगलोर व बेळगाव लोकायुक्तांकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत चिकोडी उपविभागीय अधिकाऱ्यांनी निपाणी तहसीलदार सुरेश मुंजे व एओ पी. बी. कट्टी यांना चौकशी व पंचनामा करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी ढोणेवाडी येथे भेट देत तलाव परिसराची पाहणी करून पंचनामा केला असून अहवाल उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले. अहवालानुसार दोषींवर पुढील कारवाई होणार असल्याने संबंधितांमध्ये खळबळ उडाली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, तलाव सुशोभीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात गौण खनिज महाराष्ट्रात विकण्यात आले असून त्याचा हिशोब ग्रामपंचायत किंवा ग्रामस्थांना देण्यात आलेला नाही. याशिवाय घरकुल योजनेत लाभार्थ्यांकडून रक्कम उकळणे, पाळणाघर योजनेत प्रत्यक्ष काम न करता महिलांच्या नावे निधी काढणे आदी गैरप्रकार झाल्याचाही आरोप करण्यात आला आहे. दोषींवर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, माजी ग्रामपंचायत सदस्य जनार्दन घाटगे व वैभव पाटील यांनी गावातील सीसी रस्त्याच्या निकृष्ट कामाचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे.

याबाबत ग्रामपंचायत अध्यक्षा यांनी तलावातील मुरूम विक्रीतूनच सुशोभीकरण करण्यात आल्याचे सांगत आरोप राजकीय हेतूने करण्यात आल्याचा दावा केला आहे.



थोडे नवीन जरा जुने