अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव येथील पी.एम. श्री सरकारी प्राथमिक मराठी शाळा आज केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठीच नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या प्रेरणादायी उपक्रमासाठीही परिसरात विशेष ओळख निर्माण करत आहे. या परिवर्तनामागे शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक आर. एम. पकाले यांचे अथक परिश्रम आणि निसर्गप्रेम महत्त्वाचे ठरत आहे.
ऐन उन्हाळ्याच्या कडक झळा बसत असताना, परिसरातील झाडे कोमेजू नयेत म्हणून पकाले सर स्वतः शाळेत उपस्थित राहून झाडांची काळजी घेत आहेत. शाळा परिसरातील प्रत्येक झाडाला नियमित पाणी मिळावे यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेत पाईपलाईनच्या माध्यमातून झाडांना पाणी देण्याची व्यवस्था केली आहे. उन्हाळी सुट्टीचा काळ इतरांसाठी विश्रांतीचा असला तरी पकाले सरांसाठी तोही कर्तव्यपूर्तीचाच भाग ठरत आहे.
“शाळा परिसरातील झाडे म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांसारखीच आहेत,” या भावनेतून ते प्रत्येक रोपट्याची जपणूक करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे शाळेचा परिसर हिरवागार होत असून भविष्यात विद्यार्थ्यांना शुद्ध हवा, सावली आणि निसर्गरम्य वातावरणाचा लाभ मिळणार आहे.
आर. एम. पकाले यांनी शाळेला ‘पी.एम. श्री’ दर्जा मिळवून देण्यासाठीही मोलाचे योगदान दिले आहे. शैक्षणिक गुणवत्ता उंचावणे, सुविधा विकसित करणे आणि विद्यार्थ्यांसाठी आदर्श शैक्षणिक वातावरण निर्माण करणे यासाठी त्यांनी सातत्याने परिश्रम घेतले आहेत.
आजच्या धकाधकीच्या काळात स्वतःच्या आरामापेक्षा समाजहिताला प्राधान्य देणारे व्यक्तिमत्त्व क्वचितच पाहायला मिळते. पकाले सरांनी आपल्या कृतीतून खरा शिक्षक हा वर्गाबाहेरही समाज आणि निसर्गासाठी तितक्याच जबाबदारीने उभा असतो, हे सिद्ध केले आहे.
त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे बोरगाव परिसरात त्यांच्याविषयी आदराची भावना अधिक दृढ झाली असून, त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे.
