अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव गावचे आराध्य दैवत असलेल्या श्री ज्योतिर्लिंग देवस्थानच्या वार्षिक यात्रोत्सवाला भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात सुरवात झाली.. गेल्या तब्बल ७२ वर्षांची परंपरा जपत सालाबादप्रमाणे यंदाची यात्रा थाटामाटात आणि धार्मिक उत्साहात साजरी होत असून, गावासह परिसरात भक्तीचे वातावरण निर्माण झाले आहे.श्री ज्योतिर्लिंग व प.पूज्य शांतानंद महाराज यांच्या यात्रेला
शनिवार, दि. २ मे रोजी सकाळी भक्तिमय वातावरणात सुरवात होऊन श्री बारा ज्योतिर्लिंग देवस्थान व समाधी मंदिरात परमपूज्य शांतानंद महाराज यांच्या मूर्तीस अभिषेक घालून धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली. त्यानंतर सायंकाळी बुधवार बाजारपेठेतील भव्य मंडपात श्री ज्योतिर्लिंग देवाच्या पालखीची बैठक व्यवस्था करण्यात आली. आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई आणि भक्तांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.
रविवार, दि. ३ मे हा यात्रेचा मुख्य दिवस असून, या दिवशी कर्नाटक व महाराष्ट्रातील शेकडो भाविकांनी यात्रेसाठी बोरगावात हजेरी लावली. घोडे, हत्ती, उंट, बँडबाजा, हलगी आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात परम पूज्य शांतानंद प्रसाद महाराज यांच्या उपस्थितीत श्री ज्योतिर्लिंग देवाची भव्य पालखी मिरवणूक संपूर्ण गावातून काढण्यात आली. भक्तांच्या जयघोषात आणि अध्यात्मिक वातावरणात ही मिरवणूक अत्यंत भक्तिमय स्वरूपात पार पडली.
यावेळी निपाणी भागातील युवा नेते श्री उत्तम पाटील यांनी श्री ज्योतिर्लिंग देवाला पुष्प अर्पण करून विशेष पूजा केली. यावेळी देवस्थानचे महाराज परम पूज श्री शांतानंद प्रसाद महाराज, यात्रा कमिटी प्रमुख राजू ऊरणकर दादा आणि बाळासाहेब ऊरणकर यांच्या हस्ते पाटील यांना शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी पूजन व महाप्रसादाच्या भोजन व्यवस्थेचे पूजनही पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यात्रेनिमित्त देवस्थानच्या वतीने आलेल्या सर्व भक्तगण आणि गावकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो भाविकांनी भक्तिभावाने महाप्रसादाचा लाभ घेतला. गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि देवस्थान समितीच्या नियोजनबद्ध व्यवस्थेमुळे संपूर्ण सोहळा उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असून
यात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. ४ मे रोजी रात्री सात वाजता सुप्रसिद्ध झी मराठी द्यानेश्वरी भारुड प्रबोधनकार ह.भ. संतोष महाराज कडवेकर यांचे प्रबोधनात्मक सोंगी भजन, तर दि. ५ मे रोजी रात्री नऊ वाजता सुतार बंधू प्रेझेंट्स, कोल्हापूर यांचा ‘झंकार बिट्स ऑर्केस्ट्रा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, भक्तांसाठी धार्मिक व सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे.
बोरगावच्या श्री ज्योतिर्लिंग यात्रोत्सवामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला असून, गावकऱ्यांच्या एकोप्याचे आणि धार्मिक परंपरेचे हे प्रेरणादायी प्रतीक ठरत आहे. श्री ज्योतिर्लिंग देवाची पालखी मिरवणूक,महाप्रसाद, व मनोरंजन कार्यक्रम पार पडण्यासाठी संपूर्ण गावातील युवक,यात्रा कमिटी, व भक्तगन मंडळीचे सहकार्य मिळत असल्याचे दिसून आले.
