Top News

खणदाळ गावासाठी २५ लाखांचा निधी मंजूर

 


सुनिल दावणे / शिवार न्यूज नेटवर्क :

खणदाळ ( ता- गडहिंग्लज) गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आपल्या निधीतून खणदाळ गावासाठी तब्बल २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

या निधीतून गावात पाच हाय मास्ट दिवे बसविण्यात येणार असून हे दिवे सौरऊर्जेवर चालणारे असतील. विशेष म्हणजे या दिव्यांना शून्य मेंटेनन्सची सुविधा असल्यामुळे ग्रामपंचायतीवर कोणताही अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही. प्रत्येक दिव्याची किंमत सुमारे पाच लाख रुपये असून एकूण पाच पॉईंट मंजूर करण्यात आले आहेत.

या विकासकामांमुळे खणदाळ गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. निधी मंजूर झाल्यानंतर प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाल्याची माहिती समोर आली आहे.

या कामासाठी महाडिक युवाशक्तीचे प्रमुख नेते तथा समर्थक गिरीष पाटील (शब्दीर मुल्ला) आणि त्यांच्या टीमने विशेष पाठपुरावा करून सहकार्य केले आहे. 

गिरीष पाटील यांच्याकडे कोणताही पद नसताना गावाच्या विकासासाठी होत असलेल्या या प्रयत्नांमुळे नागरिकांकडून कौतुकांचा वर्षाव होत आहे. गावातील युवकांच्या क्रीडा विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सामाजिक कार्यकर्ते गिरीष पाटील यांनी खणदाळ येथे रनिंग ट्रॅक व क्रिकेट मैदान उभारण्यासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

गावात सध्या दर्जेदार क्रीडा सुविधा नसल्याने युवकांना सरावासाठी अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर रनिंग ट्रॅक व सुसज्ज क्रिकेट मैदान उभारल्यास स्थानिक खेळाडूंना मोठा फायदा होईल तसेच ग्रामीण भागातील क्रीडा प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळेल, असे गिरीष पाटील यांनी सांगितले.

यावेळी धनंजय महाडिक यांनी प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून योग्य त्या स्तरावर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकल्पामुळे खणदाळ गावात क्रीडा संस्कृतीला चालना मिळणार असून युवकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनंजय महाडिक यांच्या माध्यमातून मराठी शाळेसाठी दोन नवीन खोल्यांचे बांधकाम पूर्ण झाले असून यासाठी सुमारे वीस लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे.

तसेच गावातील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरणाचे कामही पूर्ण झाले असून यासाठी सुमारे सहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामांमुळे गावातील वाहतूक व्यवस्था अधिक सुकर झाली आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेला स्पोर्ट्स किटचे वाटप करण्यात आले आहे. याशिवाय शाळेला दोन संगणक व एक प्रिंटरही देण्यात आले असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. यावेळी गावचे सरपंच अश्विनी पाटील यांचाही गावच्या विकासासाठी सहकार्य लाभला आहे.


थोडे नवीन जरा जुने