अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
किरकोळ वादातून बोरगाव येथे युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना मंगळवार दिनांक 26 मे 2026 रोजी सुमारे साडेसहा वाजता घडली. पांडू वसवाडे (रा. तळवार कोडी बोरगांव, वय वर्षे 37) असे खूनी हल्ला झाल्याचे युवकाचे नाव असून सदर युवकास पुढील उपचारासाठी सांगली सिविल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार दिनांक 25 मे 2026 रोजी सायंकाळी शहरातील तळवार कोडी येथे युवकांमध्ये किरकोळ वाद झाला होता. काही नेत्यांनी पुढाकार घेऊन हा वाद मिटवला होता. आज सायंकाळी तळवार कोडी येथील पांडू वसवाडे हा युवक किराणा दुकान साहित्य आणण्यासाठी बोरगाव येथे येत असता केईबी नजीक शहरातील गौतम कट्टी व अन्य एकाने पांडूवर धारधार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात पांडू हा गंभीर जखमी झाला. पांडू वर हल्ला झाल्यानंतर हल्लेकोरानी घटनास्थळावरून पसार झाले. ही माहिती समजतात पांडू याचे नातेवाईकांनी जखमी पांडुस तातडीने शहरातील एका खासगी हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेले परंतु परिस्थिती गंभीर असल्याने त्याला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी नेण्यात आले.
सदर घटनेची माहिती समजताच सदलगा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती मिळवली व जखमी पांडू याला तातडीने पुढील उपचारासाठी इचलकरंजी येथून पुढील उपचार साठी सांगली येथील दवाखान्यात दाखल केले.
घटनेची माहिती बोरगाव शहरात वाऱ्यासारखी पसरताच खाजगी दवाखान्यासमोर मोठी गर्दी झाली होती. किरकोळ वादातून धराधार शस्त्राने वार झाल्याने बोरगाव येथे या घटनेचे एकच चर्चा रंगली होती. रात्री उशिरानंतर सदर घटनेची नोंद सदलगा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार करीत आहेत.
