शेडशाळ / शिवार न्यूज नेटवर्क :
साने गुरुजी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल शेडशाळ येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कुमार ऋतुराज रवींद्र बेळंके याने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (एन.एम.एम.एस.) २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे. दिव्यांग प्रवर्गातून तो शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला असून त्याला दरवर्षी १२ हजार रुपयांप्रमाणे एकूण ४८ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे.
ऋतुराजच्या या यशाबद्दल शाळेत त्याचा व त्याच्या पालकांचा मुख्याध्यापिका श्रीमती माणिक नागावे, सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दिव्यांगत्वावर मात करत ऋतुराजने नियमित शाळेत उपस्थित राहून अभ्यासावर सातत्याने लक्ष केंद्रित केले. गुरुजनांचा आदर ठेवत दररोज अभ्यासाचा पाठपुरावा केल्यामुळे त्याने हे यश मिळवले.
त्याच्या या यशामुळे शाळा, कुटुंब आणि गावाचे नाव उज्वल झाले आहे. या प्रवासात त्याच्या पालकांची साथ अत्यंत मोलाची ठरली. तसेच संस्थेचे अध्यक्ष रावसाहेब उर्फ दा.आ. पाटील, सचिव अजित पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन लाभले. विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका पद्मावती घाट व इतर शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. ऋतुराजची ही कामगिरी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
