इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दत्तवाड (ता. शिरोळ ) येथील गावात गेल्या पाच ते सहा वर्षांपासून कोतवाल पद रिक्त असून यामुळे स्थानिक शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत असून येथील ग्रामस्थ कोतवालच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे. कोतवाल हा गावातील प्रशासनाचा महत्त्वाच्या दुवा मानला जातो. गावातील कायदा व सुव्यवस्था राखणे, शासकीय आदेशांची अंमलबजावणी करणे तसेच महसूल विभागाला आवश्यक ती मदत करणे अशा विविध जबाबदाऱ्या या पदाची संबंधित असतात त्यामुळे हे पद गावच्या दैनंदिन व्यवस्थापनासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. सध्या हे पद रिक्त असल्यामुळे काही प्रशासकीय कामावर परिणाम होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. दीर्घकाळापासून हे पद भरले गेले नसल्याने अनेक कामे रखडत असल्याचे ही शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. दत्तवाड येथील अजित अपराध यांच्याकडे कोतवाल पदाची जबाबदारी होती. परंतु, सेवेवर असतानाच त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या निधनानंतर याठिकाणी कोतवाल भरती झालेली नाही. त्यामुळे कोतवाल या पदाची जागा या ठिकाणी रिक्त आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर कोतवाल पद भरून गावातील प्रशासन सुरळीत करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
