Top News

केबल टी.व्ही.रिचार्ज ऑफिस मध्ये काम करीत सायली चे स्पर्धा परीक्षांमध्ये लखलखीत यश



कोल्हापूर / शिवार न्यूज नेटवर्क :

जर आपण आपल्या आयुष्यामध्ये एखादं ध्येय निश्चित केला असेल आणि या निश्चित केलेल्या ध्येयाचा पाठलाग प्रामाणिकपणे,जिद्दीने, अभ्यासातील सातत्य व कष्टाने केला तर निश्चितपणे यश मिळू शकते याचं उदाहरण म्हणजे निगवे खालसा (ता. करवीर) येथील सर्वसामान्य मांडवकर कुटुंबीयातील सायली नामदेव मांडवकर होत. गावातील केबल रिचार्ज ऑफिसमध्ये काम करीत अभ्यास करत तिने स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या मुद्रांक व नोंदणी विभागामध्ये यश प्राप्त करून मिळवलेलं यश हे निश्चितच सध्याच्या तरुणाईला प्रेरणादायी ठरले आहे.

घरची परिस्थिती बेताची व सर्वसामान्य असताना सायलीने बी.एस्सी कॉम्प्युटर सायन्स (B.C.A) चे शिक्षण दूधसाखर महाविद्यालय बिद्री येथे पूर्ण केले.त्यानंतर तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. कॉलेज करीत असतानाच तिने गावातील तुषार पाटील यांच्या केबल टीव्ही रिचार्ज दुकानात सकाळ व संध्याकाळ पार्ट टाईम अभ्यास करीत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तलाठी व ग्रामसेवक परीक्षेमध्ये एक-दोन मार्गाने तिची संधी हुकली. पण त्याकडे दुर्लक्ष करीत तिने अपयशात दडलेली संधी शोधत पुन्हा जिद्दीने दररोज सहा-सात तास अभ्यास करीत तिने महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील परीक्षेत उत्तीर्ण होऊन यश प्राप्त केले.सध्या ती शाहुवाडी येथील मुद्रांक व नोंदणी विभागामध्ये रुजू झाली आहे .

मांडवकर कुटुंबीय तसे गावातील अध्यात्मक क्षेत्रातत हीरहीरीने भाग घेणारे १५-२० जणांचा सर्वसामान्य कुटुंबीय.वडील नामदेव मांडवकर व चुलते नंदकुमार मांडवकर यांनी गेली २५-३० वर्षे दत्तपंक्ती भजनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचे कार्य करीत आहेत. सायलीची चुलते कै. आनंदराव मांडवकर यांनी देखील कष्टातून व संघर्षातून विविध प्रकारची कामे करून बी.एड करून पंधरा वर्षे एक रुपये पगार न घेता अनेक होतकरू विद्यार्थी घडवले. कालांतराने शिक्षकाची नोकरी कायमस्वरूपी झाली. पण दुर्दैवाने दुसऱ्याच वर्षी त्यांचे दुःखद निधन झाले.मांडवकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला.पण सर्व भावानी धीर-गंभीर पणे या संकटात एकमेकाला साथ देत आलेल्या संकटाला तोंड देत आता मांडवकर कुटुंबीय आनंदाने व हसत खेळत संसाराचा गाडा पुढे नेत आहे.

सायलीचा एक भाऊ आंतरभारती शिक्षण संस्थेत लिपिक आहे. तर दोन भाऊ खाजगी कंपनीत कामाला आहे. दुसरी चुलत बहीण ही देखील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत आहे. हसत खेळत आनंदात असणाऱ्या मांडवकर कुटुंबातील सायलीच्या या सरकारी नोकरीच्या यशाने अख्ख मांडवकर कुटुंबीय आनंदात न्याहून निघाले आहे .सायलीच्या यशाबद्दल शिवम प्रतिष्ठान निगवे खालसा यांच्यावतीने गुरुदत्त साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी विकास चौगले व बिद्री साखर कारखान्याचे तोडणी-वाहतूक विभागाचे अधिकारी कृष्णात ढवण यांच्या हस्ते तिचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या!

थोडे नवीन जरा जुने