शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
नांदणी गाव हद्दीत अवैधरित्या मावा तयार करून विक्री करणाऱ्या पानटपरी चालकावर शिरोळ पोलिसांनी कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत तयार माव्याच्या पुड्या व रोख रक्कम असा एकूण 5 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 एप्रिल रोजी सकाळी 11.35 वाजण्याच्या सुमारास नांदणी गाव हद्दीत भारत बँकेजवळील मिलन पान शॉप येथे ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी अनिकेत दिलीप धर्मे (वय 25, रा. 8 वी गल्ली, राजीव गांधी नगर, जयसिंगपूर, ता. शिरोळ) हा आपल्या पानटपरीवर सुगंधी तंबाखू, सुपारी व इतर पदार्थांचे मिश्रण करून मावा तयार करत होता.
सदर माव्यावर कोणतेही लेबल किंवा वैधानिक इशारा न लावता तो विक्रीसाठी तयार ठेवण्यात आला होता. पोलिसांनी छापा टाकून 157 तयार माव्याच्या पुड्या (प्रत्येकी 30 रुपये किंमत) असा 4 हजार 710 रुपयांचा मुद्देमाल तसेच 420 रुपये रोख रक्कम जप्त केली. असा 5 हजार 130 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी सुशांत सुरेश ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरोळ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिकेत धर्मे याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
