Top News

पाणंद रस्ते योजनेचा लाभ घ्या; अतिक्रमण हटवून प्रशासनास सहकार्य करा : मनीषाताई कदम

प्रल्हाद साळुंखे / शिवार न्यूज नेटवर्क :

 मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा तसेच अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे काढून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत समिती उपसभापती सौ. मनीषाताई रणजित कदम यांनी केले.

शिरदवाड ग्रामपंचायत येथे बुधवार, दि. 15 एप्रिल 2026 रोजी पाणंद रस्त्याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत ग्रामपंचायत अधिकारी श्री. विजय माळी यांनी शासन निर्णयाचे वाचन करून योजनेची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी श्री. आवळे यांनी पाणंद रस्त्यांची कामे कशा प्रकारे राबविण्यात येणार आहेत, तसेच विविध विभागांची जबाबदारी काय असेल याबाबत मार्गदर्शन केले.

यावेळी श्री. रणजित दादा कदम यांनी गावातील सर्व पाणंद रस्ते पूर्णत्वास नेण्याचा निर्धार व्यक्त करत शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे सांगितले.

बैठकीदरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दि. 17 एप्रिल 2026 रोजी 11 गावे बंद ठेवण्याबाबत आलेल्या पत्राचे वाचन ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव कुंभार यांनी केले. या प्रस्तावाला उपस्थित ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दर्शविला.

उपसभापती सौ. मनीषाताई कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांचा श्वास आहे. शेतीसाठी ट्रॅक्टर, रोटावेटर, मळणी यंत्रे शेतात पोहोचण्यासाठी तसेच पिकवलेला माल बाजारपेठेत नेण्यासाठी चांगल्या रस्त्यांची आवश्यकता असते. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे.”

या बैठकीस सरपंच तथा प्रशासक सौ. सुजाता मारुती कोळी, ग्रामपंचायत अधिकारी श्री. विजय माळी, ग्राम महसूल अधिकारी श्री. आवळे, ग्रामपंचायत सदस्य श्री. महादेव कुंभार, श्री. रणजित दादा कदम, कदम अण्णा सोसायटीचे चेअरमन अभिजित पाटील, संचालक विश्वास पाटील, अमोल पाटील, श्री. आशुतोष पाटील तसेच ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

बैठकीचे आभार प्रदर्शन श्री. आशुतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमास शिरदवाड येथील ग्रामस्थ व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडे नवीन जरा जुने