हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
“सोशल मीडियाच्या आहारी गेलेला समाज नात्यांपासून दूर जात आहे आणि हीच खरी धोक्याची घंटा आहे,” असा भावनिक आणि विचारप्रवर्तक संदेश देत वक्त्यांनी बदलत्या जीवनशैलीवर परखड भाष्य केले. पूर्वी गावात माणुसकी, आपुलकी आणि जबाबदारीची नाती जपली जात होती; आज मात्र मोबाईल आणि स्वार्थामुळे ती नाती हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कुटुंबातील संवाद कमी होत असून घरं ‘मुकी’ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. नात्यांतील प्रेम, जिव्हाळा आणि परस्पर समजूतदारपणा हरवत चालल्यामुळे समाजात तणाव वाढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “पैसा आनंद देऊ शकत नाही; नाती जपण्यासाठी प्रेम आणि संस्कार आवश्यक आहेत, असे सांगत त्यांनी तरुण पिढीला मूल्याधिष्ठित जीवन जगण्याचे आवाहन केले. माफ करण्याची वृत्ती, नम्रता आणि वैरभाव टाळणे हीच खरी माणुसकीची ओळख असल्याचा संदेश देत त्यांनी समाजाने पुन्हा नात्यांकडे वळण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध व्याख्याते युवराज पाटील यांनी केले. येथील शेतकरी फौंडेशन संचलित उत्कर्ष फौंडेशनच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले, बदलत्या काळात पारंपरिक नाती, माणुसकी आणि सामाजिक जबाबदारीची जपणूक कमी होत चालल्याची खंत व्यक्त करत वक्त्यांनी पूर्वीच्या समाजव्यवस्थेचे जिवंत चित्र उभे केले. एकेकाळी गावात प्रत्येक माणूस एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत असे. विशेषतः मुलींच्या लग्नापासून ते त्यांच्या संसारातील अडचणीपर्यंत गावातील ज्येष्ठ व्यक्ती स्वतः पुढाकार घेऊन जबाबदारी उचलत असत. “ही मुलगी माझ्या जबाबदारीवर” असे ठामपणे सांगणारी माणसं समाजात होती. एखाद्या कुटुंबात वाद निर्माण झाला तरी तो सोडवण्यासाठी हीच मंडळी पुढे सरसावत असत, त्यामुळे अनेक संसार टिकून राहत होते.
पूर्वी गावातील मुलगा-मुलगी हे संपूर्ण गावाचेच मानले जात; अडचणीत कोणीही एकमेकांच्या मदतीला धावून जात असे. नात्यांमध्ये आपुलकी, जिव्हाळा आणि विश्वास होता. परंतु आजच्या युगात ही संस्कृती हळूहळू हरवत चालली आहे. तंत्रज्ञानाचा वाढता वापर, स्वार्थी विचारसरणी आणि व्यस्त जीवनशैली यामुळे माणूस माणसापासून दूर जात आहे. घरात संवाद कमी झाला असून नाती केवळ औपचारिक राहिली आहेत.
या बदलामुळे कुटुंब आणि समाजातील बंध कमकुवत होत असून लहान-सहान कारणांवरून वाद वाढताना दिसतात. पूर्वी ज्या गोष्टी प्रेमाने आणि समजुतीने सोडवल्या जात होत्या, त्या आज कोर्ट-कचेऱ्यांपर्यंत पोहोचत आहेत. त्यामुळे समाजाची एकजूट ढासळत आहे. ही हरवलेली माणुसकी, नात्यांची उब आणि परस्परांतील विश्वास पुन्हा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. समाज टिकवण्यासाठी नाती जपणे आणि एकमेकांसाठी उभे राहणे आवश्यक असल्याचा ठाम संदेश त्यांनी यावेळी दिला.
यावेळी हेरवाड गांवचे नांव उज्वल केलेले डॉ. रोहिणी माळी, डॉ. बेनझिर बाणदार, अथर्व पाटील, धनाजी चव्हाण, आलमास जमादार, रसिका तेरवाडे, भूमिका मोहिते, निशिगंधा कडोले, प्रा. बाळकृष्ण फल्ले, बादल तेरवाडे, सुधीर सुतार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनिल माळी, दिलीप पाटील, आण्णा परुळेकर, अर्जुन जाधव, पायगोंडा आलासे, सचिन पाटील, सुकुमार पाटील, प्यारेलाल मकानदार आदी उपस्थित होते.
