Top News

नृसिंहवाडी दत्तधाम मध्ये उद्या श्री चंडी याग

अनिल जासुद / शिवार न्यूज नेटवर्क :

   श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त नृसिंहवाडी येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ,दत्तधाममध्ये सुरु असलेल्या सप्ताहामध्ये शुक्रवारी भक्तीमय वातावरणात शेकडो सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत हवनयुक्त श्री गणेश याग व मनोबोध याग संपन्न झाला. उद्या शनिवारी सकाळी साडेदहा वाजता श्री चंडी याग हा प्रत्यंगिरा मंत्र उच्चारुन स्वाहाकार पद्धतीने विधीपुर्वक होणार आहे. श्री चंडी याग ही आई भगवतीची अतिउच्च सेवा मानली जाते.यामुळे ही सेवा आई भगवतीच्या ,आपल्या कुलदेवतेच्या चरणी रुजु करण्यासाठी सेवेकरी ,भाविकांनी उपस्थित रहावे.

   आखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर,नाशिकचे पिठाधीश  परमपुज्य गुरुमाऊली यांच्या आदेशानुसार व गुरुपुत्र चंद्रकांतदादा यांच्या मार्गदर्शनाखाली नृसिंहवाडीसह गाणगापुर,पिठापूर व त्र्यंबकेश्वर या चार गुरुपीठात तसेच देश-विदेशातील सर्व श्री स्वामी समर्थ केंद्रात एकाचवेळी अखंड नाम,जप,यज्ञ सप्ताह सुरु आहे.   

यानुसार दुसर्‍या दिवशी सकाळी आठ वाजता भुपाळी आरती झाली. यानतंर श्री गुरुचरित्रातील दहा ते एकवीस अध्यायापर्यंत सामुहिक वाचन झाले. यज्ञ विभागामध्ये याज्ञिकीनी विधीवत मंत्रोच्चाराने सकाळी यजमानाच्या हस्ते नित्य स्वाहाकार केला. सकाळी अकरा वाजता शेकडो सेवेकर्‍यांच्या उपस्थितीत हवनयुक्त श्री गणेश याग व मनोबोध याग झाला.  दरम्यान सकाळी साडेदहाला नैवेद्य आरती झाली.यानतंर पालखी प्रदक्षिणा झाली.

याग पुर्ण झाल्यानतंर सेवा केंद्राच्या प्रतिनिधीनी अध्यात्मिक सेवा कशी करायची या विषयावर मार्गदर्शन केले. दुपारच्या सत्रात सामुहिक श्री दुर्गा सप्तशती,स्वामीचरित्र सारामृत पाठ वाचन, श्री मल्हारी सप्तशती पाठवाचन करण्यात आले. सांयकाळी सहा वाजता औंदुबर प्रदक्षिणा,साडेसहा वा.नैवेद्य आरती झाली.सात वा.विविध विषयावर मार्गदर्शन झाले. नित्यसेवा व नित्यध्यान मध्ये गीतेचा पंधरावा अध्याय,विष्णु सहस्त्रनाम,शांती पाठ आदी सेवा करण्यात आल्या. 

उद्या शनिवारी हवनयुक्त श्री चंडी याग होणार आहे. सप्ताहकाळातील सर्व धार्मिक कार्यक्रमांचा सर्व भाविक,सेवेकरी भक्तानी लाभ घ्यावा.तसेच ज्या भाविकाना सप्ताहाकाळात अन्नदान करण्यासाठी धान्य,वस्तु,पदार्थ,देणगी द्यावयाचे असेल त्यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दत्तधाम येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

 दत्तधाममध्ये अखंड २४ तास प्रहर सेवा

सप्ताहामुळे नृसिंहवाडी दत्तधाममध्ये अखंड २४ तास प्रहरी सेवा सुरु आहे.यामध्ये सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत महिलावर्ग व रात्री ८ ते सकाळी ८ पर्यंत पुरुषवर्ग प्रहरीची अति उच्च सेवा करु शकतात.

 यामध्ये वीणा वादन,श्री स्वामी चरित्र सारामृत वाचन,नाम,जप या सेवा आहेत.ज्या सेवेकर्‍यांना काही कामानिमित्त सप्ताहासाठी पारायणाला बसता आले नाही.त्यांनी केंद्रातील वेळेनुसार प्रहरीची अतिउच्च सेवा श्री स्वामी चरणी रुजु करु शकतात.

थोडे नवीन जरा जुने