कुरुंदवाड / शिवार न्यूज नेटवर्क :
कुरुंदवाड स्वातंत्र्य सेनानी कै. श्रीपाल आलासे (काका) कुरुंदवाड नागरी सहकारी बँक मर्या., कुरुंदवाडने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये भक्कम आर्थिक कामगिरी नोंदवत ४ कोटी ६३ लाख रुपयांचा ढोबळ नफा मिळविला असून बँकेने ७०० कोटी रुपयांच्या एकूण व्यवहाराचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केल्याची माहिती अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कृष्णा व पंचगंगेच्या काठावर वसलेल्या कुरुंदवाड नगरीतील या बँकेने ७१ वर्षांची विश्वासार्ह परंपरा कायम राखत सभासद व ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ केला आहे. बँकेचे भागभांडवल १८ कोटी ७१ लाखांवर पोहोचले असून स्वनिधी ४९ कोटी ६१ लाख इतका झाला आहे. ठेवींमध्येही लक्षणीय वाढ होऊन त्या ४३८ कोटी १५ लाखांपर्यंत पोहोचल्या आहेत, तर कर्जवाटप २६६ कोटी ६० लाखांवर गेले आहे.
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार बँकेने १९२ कोटी ०३ लाखांची गुंतवणूक केली असून अनुत्पादक कर्जे नियंत्रणात ठेवण्यात बँकेला यश आले आहे. सध्या बँकेचे एकूण अनुत्पादक कर्ज प्रमाण ३.१० टक्के तर निव्वळ अनुत्पादक कर्ज प्रमाण १.०२ टक्के इतके आहे. तसेच भांडवल पर्याप्तता गुणोत्तर १३.३४ टक्के राखण्यात आले असून बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
बँकेकडून एकत्रित देयक प्रणाली, तत्काळ निधी हस्तांतरण सेवा, स्वयंचलित चलन यंत्र, रुपे नामांकित डेबिट कार्ड, मोबाईल बँकिंग, तात्काळ सकल निधी हस्तांतरण, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक निधी हस्तांतरण, संदेश बँकिंग, धनादेश छपाई प्रणाली, कोणत्याही शाखेत व्यवहार सुविधा आदी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. लवकरच बँकेचे कोअर बँकिंग प्रणालीचे कामकाज मेघ संगणन प्रणालीवर सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या बँकेच्या २३ शाखा कार्यरत असून रत्नागिरी जिल्ह्यातील साडवली येथे नवीन शाखा सुरू झाली आहे, तर सांगली जिल्ह्यातील आरग येथे २४ वी शाखा लवकरच सुरू होणार आहे. याशिवाय कर्मचारी वर्गासाठी नवीन वेतनश्रेणी लागू करून वार्षिक ६० लाखांची वेतनवाढ देण्यात आली आहे.
शेतकरी, महिला व तरुण उद्योजकांसाठी विविध कर्ज योजना राबवून आर्थिक विकासाला चालना देण्याचा बँकेचा प्रयत्न असल्याचेही अध्यक्ष पाटील यांनी नमूद केले.
या प्रसंगी जनरल मॅनेजर आर. आय. राठोड, सुधाकर बाळासो पाटील, अरुण श्रीपाल आलासे, महादेव ज्ञानू धनवडे, मोनाप्पा बाबुराव चौगुले, सुनिल जनगोंडा पाटील, इकबाल बालेचौद पटवेगार, भगवान दशरथ गायकवाड, दिपाली अजित पाटील, सुरेश उर्फ नंदकुमार नाना पाटील, रेश्मा इकबाल पाटील, बाळासाहेब तात्यासो नाईक, महावीर बाबुराव थोटे, सुर्यकांत सुरेश कुसनाळे, निखिल अरुण आलासे, ओंकार दत्तात्रय माळी, सुजाता आदिनाथ भबिरे, भरत आण्णासो चौगुले, सरिता राजेंद्र जोंग, अॅड. सचिन उर्फ सुनिल सुभाष कठारे (तज्ञ संचालक), कपिल सुरेंद्र देमापुरे (तज्ञ संचालक) उपस्थित होते.
