Top News

औरवाड, अब्दुललाट, हेरवाड व हरोली पोटनिवडणूक : ४ अर्ज दाखल

Ai


शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :

शिरोळ  तालुक्यातील औरवाड, अब्दुललाट, हेरवाड व हरोली ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून अर्ज दाखल प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मात्र अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशीही उमेदवारांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे हरोली गाव वगळता इतर कोणत्याही ग्रामपंचायतीत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हरोली येथे दोन इच्छुक उमेदवारांनी एकूण चार अर्ज दाखल केले आहेत. उर्वरित औरवाड, अब्दुललाट व हेरवाड या गावांमध्ये अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल न केल्याने स्थानिक पातळीवर चर्चांना उधाण आले आहे.

या पोटनिवडणुकीत विविध कारणासाठी रिक्त असलेल्या जागांसाठी निवडणूक होत आहे. औरवाड येथील प्रभाग क्रमांक ४ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला), अब्दुललाट येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) तसेच प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती, तर हेरवाड येथील प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमाती (महिला) या जागांसाठी तर हरोली येथे प्रभाग क्रमांक ४ सर्वसाधारण १ जागेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.

निवडणूक कार्यक्रमानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत १३ एप्रिल आहे. त्यानंतर १५ एप्रिल रोजी अर्जांची छाननी केली जाणार असून १७ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची संधी उपलब्ध राहणार आहे. त्याच दिवशी दुपारी चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रिया २८ एप्रिल रोजी पार पडणार असून २९ एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. सध्या तरी उमेदवारांचा अल्प प्रतिसाद पाहता पुढील काही दिवसांत अर्ज भरण्याची गती वाढते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

थोडे नवीन जरा जुने