शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
गणेशवाडी येथील गणेश सहकारी पाणी पुरवठा संस्थेतील थकीत बैठा पाणीपट्टी व कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून तक्रारदार शिवाजी सदाशिव कोळेकर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार शिरोळ तहसील कार्यालयासमोर आजपासून प्राणांतिक उपोषणाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली असून प्रशासनावरही दबाव वाढला आहे.
तक्रारदार कोळेकर यांच्या तक्रारीनुसार, संस्थेचे काही विद्यमान संचालक व सभासद यांनी अधिकाराचा गैरवापर करत संस्थेच्या कार्यक्षेत्रात नियमबाह्य खाजगी पाणीपुरवठा योजना राबविल्या आहेत. या माध्यमातून संबंधितांकडून स्वतःच्या शेतीस पाणीपुरवठा केला जात असून काही ठिकाणी विहिरींमध्ये पाणी साठवून पुन्हा उपसा केला जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे हे सभासद संस्थेकडून अधिकृत पाणी घेत नसून, संस्थेच्या कार्यक्षेत्रातील इतर सभासदांना नियमबाह्य पद्धतीने पाणीपुरवठा करत असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे संस्थेच्या उत्पन्नावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात संस्थेच्या ५८ व ५९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संबंधितांकडून निम्म्या दराने पाणीपट्टी आकारणी व वसुली करण्याचा तसेच आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र या ठरावांची अंमलबजावणी झालेली नसल्याने तक्रारदारांनी वारंवार संस्थेशी पत्रव्यवहार केला. तरीही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने त्यांनी सहायक निबंधक सहकारी संस्था, शिरोळ यांच्याकडे तक्रार दाखल केली.
सहायक निबंधक कार्यालयाने या प्रकरणाची दखल घेत संस्थेला तात्काळ थकीत बैठा पाणीपट्टी वसुलीची कारवाई करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच संबंधित संचालक व सभासदांचा तपशील तक्रारदारास उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. आदेशांचे पालन न केल्यास पुढील प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, प्रशासनाकडून आदेश देऊनही अपेक्षित कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ कोळेकर व त्यांच्या समर्थकांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे. या आंदोलनात मल्लाप्पा अंकलखोपे, वृषभनाथ मनकापुरे, गुरुलिंगा अनुरे, गजानन मांजरे, दिलीप डफळापुरे, सुभाष शिरगावे, नागराज बिरनाळे, राजगोंडा पाटील, बिरा गावडे, हलाप्पा गावडे, अनिल गावडे आदींसह अनेक सभासद सहभागी झाले आहेत.
