![]() |
| Ai |
जयसिंगपूर / शिवार न्यूज नेटवर्क :
उदगाव येथील एमआयडीसी परिसरातील ‘मैत्री कट्टा मॅगी पॉईंट’ कॅन्टीनवर काही युवकांनी मध्यरात्री हल्ला चढवत मारहाण व तोडफोड केल्याची घटना गुरुवारी (दि. ९) पहाटे घडली. या घटनेत आकाश प्रकाश पवार हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
याबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शुभम तमन्ना नंदीवाले (वय २२, रा. नंदीवाले वसाहत, उदगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार यश धोत्रे, सत्यम मच्छले, निखील गाडीवडर, विशाल बनपट्टे, समीर (पूर्ण नावे अपूर्ण) व इतर ४ ते ५ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅन्टीनसमोर उभ्या असताना आरोपी व जखमी आकाश पवार यांच्यात ‘का बघतोस’ या कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी आकाश पवार यास शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच आणखी साथीदारांना बोलावून जमाव तयार करत सोड्याच्या बाटल्यांनी हल्ला केला. यामध्ये आरोपींपैकी एकाने बाटली डोक्यात मारल्याने पवार गंभीर जखमी झाला.
यानंतर आरोपींनी कॅन्टीनमध्ये घुसून किचन काऊंटर, टेबल-खुर्च्या व बॅनरची तोडफोड केली तसेच दगडफेक करत मोटारसायकलींचे नुकसान केले. फिर्यादी व कामगारांनाही मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ए.बी. सरनाईक यांनी गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल जाधव करीत आहेत.
