Top News

आठवड्यात दुसरा बळी ; तेरवाड–हेरवाड मार्गावर अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

तेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

तेरवाड–हेरवाड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या उत्तम कांबळे ( वय वर्षे ५० रा. अ. लाट) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, वारंवार होणाऱ्या अपघातांबाबत संतापही व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हेरवाड येथील उत्तम कांबळे आणि धनंजय कांबळे हे दोघे मोटरसायकलवरून हेरवाडकडे जात असताना मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ मिरज येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच उत्तम कांबळे यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान, या आठवडाभरात याच ठिकाणी घडलेला हा चौथा अपघात असून, याआधीही एका युवकाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्यामुळे हा दुसरा मृत्यू ठरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

धनंजय कांबळे यांच्यावर अद्याप उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणा तपास करत आहेत.

या मार्गावर वारंवार अपघात होत असल्याने तातडीने वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा अंमलबजावणी आणि इतर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

थोडे नवीन जरा जुने