बाळासो कोकणे / शिवार न्यूज नेटवर्क :
घोसरवाड (ता. शिरोळ) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त घोसरवाड येथे विविध सामाजिक उपक्रमांसह जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवून सामाजिक बांधिलकी जपली गेली.
जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कमिटीच्या वतीने ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात समाज कल्याण सभापती सौ. श्रद्धाताई गायकवाड तसेच शिरोळ पंचायत समितीचे सभापती मा. मिलिंद कुरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन सौ. उत्तरादेवी शिंदे सरकार, पंचायत समिती सदस्य बाबासो वनकुरे व विजयसिंह शिंदे सरकार यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. जयंती कमिटीचे अध्यक्ष कर्णिक यांच्यासह पांडुरंग कांबळे, सनी कांबळे, अनिल कांबळे, प्रमोद कांबळे, सुरज कांबळे, प्रकाश कांबळे, सुहास कांबळे, उमेश कांबळे, धीरज कांबळे तसेच पप्पू उर्फ बंडू व समाजातील इतर पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी गावातील मातंग समाजातील प्रतीक विजय मिसाळ यांनी डॉक्टर पदवी परीक्षा उत्तीर्ण होऊन गावाचे नाव उज्ज्वल केले. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने तसेच जयंती कमिटी आणि मातंग समाजाच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सामाजिक समता, शिक्षण आणि स्वच्छतेचा संदेश देणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
