Top News

हेरवाड दप्तर चोरी प्रकरण : दोन दिवसात चौकशी समिती येणार : गटविकास अधिकारी परीट

हेरवाड / शिवार न्यूज नेटवर्क :

हेरवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीतील काही महत्त्वाची कागदपत्रे काही दिवसांपूर्वी उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित  प्रकरणी दोन दिवसांत चौकशी समिती नेमून अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी विजय परीट यांनी दिली.

ग्रामपंचायतीतील काही दप्तर व कागदपत्रे कार्यालयात उपलब्ध नसल्याचे आढळून आले होते. त्यानंतर याबाबतची माहिती पंचायत समिती प्रशासनाला देण्यात आली होती.

दरम्यान, एका चौकशीसाठी समिती ग्रामपंचायतीत दाखल होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संबंधित कागदपत्रे पुन्हा कार्यालयात जमा झाल्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामविकास अधिकाऱ्यांनी पंचायत समितीकडे पूरक निवेदन सादर करून दप्तर पुन्हा उपलब्ध झाल्याची नोंद केली आहे.

या प्रकरणात ग्रामपंचायतीतील एका कर्मचाऱ्याने कागदपत्रे कार्यालयात आणून ठेवल्याची माहिती समोर आली असून, त्या कर्मचाऱ्याला दप्तर कोणी दिले ? त्याचा उलगडा चौकशीत होणार आहे. 

पंचायत समिती प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवण्याचे आदेश दिले असून, चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे. शासकीय कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली असून, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, अशी मागणी होत आहे.

थोडे नवीन जरा जुने