अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
गुरुवारी रात्री झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे गौरवाड येथील शेतकरी अनिल धनपाल केस्ते यांच्या दीड एकर क्षेत्रातील केळीपिक पूर्णपणे भुईसपाट झाले असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे तीन टन केळीपिकाचे नुकसान झाले आहे.
कवठेगुलंद माळभाग रोडलगत असलेल्या केस्ते मळ्यात अनिल केस्ते यांनी याच वर्षी जुलै महिन्यात जी-९ (वसई) जातीच्या केळीची लागवड केली होती. या पिकासाठी त्यांनी सुमारे दोन लाख रुपयांचा खर्च केला होता. सध्या केळीची झाडे घडांनी भरलेली असून येत्या दोन ते तीन आठवड्यांत तोडणी सुरू होणार होती. मात्र, वादळी वाऱ्याच्या तडाख्यामुळे काही क्षणांतच शेकडो झाडे घडांसह मुळासकट उपटून पडली.
झाडे कोसळू नयेत म्हणून नुकतीच मजबूत बांधणी करण्यात आली होती, तरीही वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की संपूर्ण पीक जमीनदोस्त झाले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
“मी याच वर्षी दीड एकरात केळीचे पीक घेतले होते. यासाठी लाखो रुपये खर्च केले. दोन-तीन आठवड्यांत उत्पन्न मिळायला सुरुवात झाली असती, पण अवकाळी वादळी वाऱ्यामुळे सर्व काही उद्ध्वस्त झाले. सध्या केळीच्या निर्यातीवरही परिणाम झाल्याने बाजारभाव कमी आहे. अशा परिस्थितीत हे नुकसान खूप मोठे आहे. शासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी,” अशी व्यथा अनिल केस्ते यांनी मांडली.
दरम्यान, या नुकसानीची कृषी विभागाने तातडीने दखल घेऊन पंचनामा करावा व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. शेती हा अनिश्चिततेचा व्यवसाय असून अशा संकटात शासनाची मदतच शेतकऱ्यांना दिलासा देऊ शकते, अशी भावना व्यक्त होत आहे.
