![]() |
| Ai फोटो |
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील श्री दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीच्या पात्रात एका अंदाजे ६० वर्षीय अनोळखी महिलेचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळून आला. या घटनेची नोंद शिरोळ पोलीस ठाण्यात झाली आहे. ज्ञानेश्वर गणपती भोसले (वय ४५, रा. ओतवाडी, नृसिंहवाडी) यांनी या घटनेची वर्दी शिरोळ पोलिसात दिली.
पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांना नदीच्या पात्रात एक मृतदेह तरंगताना दिसला.
मृत महिलेचे वय अंदाजे ६० वर्षे, उंची ५ फूट, रंग सावळा आणि चेहरा गोल आहे. तिचे केस काळे-पांढरे लांब असून अंगात पिवळ्या रंगाची, त्यावर लाल-हिरवे ठिपके असलेली साडी आहे. तसेच गळ्यात मणी मंगळसूत्र, हातात हिरव्या काचेच्या बांगड्या, डाव्या खांद्यावर तीळ आणि डाव्या हातावर फुलासारखे गोंदण असल्याची माहिती पोलिसांनी दिली. शिरोळ पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नसून, याबाबत अधिक माहिती असल्यास शिरोळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक तपास शिरोळ पोलीस करीत आहेत.
