‘आंदोलन अंकुश’च्या लढ्याला आता जनतेची हवी साथ ; पंचगंगेचा लढा निर्णायक टप्प्यावर
संतोष तारळे / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्याची जीवनदायिनी असलेली पंचगंगा नदी आज प्रदूषणाच्या विळख्यात अडकली असून, तिच्या मुक्तीसाठी ‘आंदोलन अंकुश’ या सामाजिक संघटनेने उभारलेला लढा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. काळा ओढा बंद करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न असो किंवा सातत्याने आंदोलने करून प्रदूषणाच्या प्रश्नावर आवाज उठवणे असो, या संघटनेने जनतेच्या हक्कासाठी लढण्याची भूमिका ठाम ठेवली आहे. मात्र हा संघर्ष केवळ एका संघटनेचा न राहता प्रत्येक नागरिकाचा व्हावा, ही काळाची गरज आहे. पंचगंगेचे प्रदूषण थांबवणे हे केवळ पर्यावरणाचे नव्हे तर आरोग्य, शेती आणि भविष्यासाठी अत्यावश्यक आहे. त्यामुळे आता हा लढा व्यापक जनआंदोलनात रूपांतरित होणे गरजेचे आहे.
शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदी ही केवळ पाण्याचा स्रोत नसून हजारो कुटुंबांचे जीवनमान उंचावणारी जीवनरेखा आहे. मात्र गेल्या काही वर्षांत या नदीचे स्वरूप पूर्णतः बदलले आहे. एकेकाळी स्वच्छ, नितळ वाहणारी पंचगंगा आज काळवंडलेल्या पाण्याने, जलपर्णीने आणि मृत माशांनी भरलेली दिसते. या बदलामागील मुख्य कारण म्हणजे औद्योगिक सांडपाणी आणि शहरातील मलनिस्सारणाचे पाणी थेट नदीत सोडले जाणे.
याच पार्श्वभूमीवर ‘आंदोलन अंकुश’ या सामाजिक संघटनेने प्रदूषणाविरोधात ठोस लढा उभारला आहे. काळ्या ओढ्याला बांध घालून प्रदूषित पाणी पंचगंगेत जाण्यापासून रोखण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न हा या आंदोलनाचा टर्निंग पॉइंट ठरला. यामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला आणि या प्रश्नाची दखल घेण्यास भाग पाडले गेले.
खरं तर पंचगंगा प्रदूषणाचा मुद्दा नवीन नाही. यापूर्वीही अनेक आंदोलने झाली, निवेदने दिली गेली; मात्र काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा पूर्ववत होत राहिली. यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. उद्योगधंद्यांकडून प्रदूषण होत असतानाही त्यांच्यावर प्रभावी कारवाई का होत नाही, हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे.
कोरोना काळात उद्योगधंदे बंद असताना पंचगंगेचे पाणी स्वच्छ झाले होते, हा अनुभव आजही नागरिकांच्या स्मरणात आहे. त्यामुळेच सध्याच्या प्रदूषणाचे मूळ उद्योगधंदे आणि शहरातील सांडपाण्यात असल्याचे स्पष्ट होते. हे वास्तव सर्वांनाच माहीत असूनही त्यावर ठोस उपाययोजना होत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
‘आंदोलन अंकुश’ने उभारलेला लढा हा केवळ एका संघटनेचा नाही, तर पंचगंगा काठावर राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचा आहे. स्वच्छ नदी ही केवळ पर्यावरणीय गरज नसून ती पिण्याच्या पाण्यासाठी, शेतीसाठी आणि जनजीवनासाठी अत्यावश्यक आहे. जर ही नदी स्वच्छ झाली, तर शेतकऱ्यांना चांगले पाणी मिळेल, नागरिकांचे आरोग्य सुधारेल आणि पर्यावरणाचा समतोलही राखला जाईल.
मात्र हा लढा यशस्वी होण्यासाठी केवळ काही कार्यकर्त्यांचे प्रयत्न पुरेसे नाहीत. प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग घेणे गरजेचे आहे. प्रशासनावर दबाव निर्माण करण्यासाठी एकत्रित जनशक्तीची आवश्यकता आहे. अन्यथा, प्रदूषणाचा प्रश्न केवळ चर्चेपुरताच मर्यादित राहील.
आज गरज आहे ती जागरूकतेची आणि एकजुटीची. ‘आंदोलन अंकुश’ने सुरू केलेल्या या लढ्याला व्यापक जनआंदोलनाचे रूप दिल्यासच पंचगंगा नदीला पुन्हा तिचे मूळ स्वरूप मिळू शकते. अन्यथा, येणाऱ्या पिढ्यांना स्वच्छ नदी केवळ इतिहासातच पाहायला मिळेल.
२७ रोजी तोडगा न निघाल्यास आमरण उपोषण
२७ एप्रिल रोजी प्रांताधिकार्यांनी पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर बैठक आयोजित केली आहे या बैठकीत कायमस्वरूपी प्रदूषणावर तोडगा न निघाल्यास १ मे पासून आमरण उपोषण आम्ही सुरू करणार आहोत. तसेच इचलकरंजीला जाणारा कृष्णेचा पाणीपुरवठा देखील आम्ही बंद करणार आहोत. हा लढा माझ्या एकट्याचा नसून पंचगंगा काठावरील प्रत्येक नागरिकाचा आहे, त्यामुळे या लढ्यात सर्वांनी सहभागी व्हावे.
- - धनाजी चुडमुंगे, आंदोलन अंकुश
