Top News

“शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या सावित्रीच्या लेकी; ग्रामीण भागात नवा आदर्श”

 


सावित्रीच्या लेकी आम्ही, शिक्षणाचा पुढे चालवू हा वारसा!

स्त्री शिक्षणाचा पाया रचूनी उघडला ज्ञानाचा नवा रस्ता !

*पुस्तक, शाळा, विद्या हाच आमुचा खरा दागिना!

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शांवर चालत नवा समाज साकार करण्यासाठीआजच्या युगात शिक्षण हेच सर्वात मोठं सामर्थ्य आहे.मुलगी शिकली तर कुटुंब, समाज आणि देश प्रगत होतो.शिक्षणामुळे आत्मविश्वास वाढतो,निर्णयक्षमता विकसित होते आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची ताकद मिळते.

म्हणूनच प्रत्येक मुलीने शिक्षणाला प्राधान्य देऊन स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवावं हीच सावित्रीबाईंच्या वारशाला खरी सलामी ठरेल. निगवे खालसा (ता.करवीर) येथिल सर्वसामान्य गरीब व बहुजन समाजातील मुलांना दर्जेदार इंग्रजी शिक्षण मिळावं या उदात्त हेतून व निरपेक्ष व परोपकारी भूमिका घेऊन ज्यांनी अनेक विद्यार्थी घडवल्या त्या निगवे खालसा येथिल ब्लोमिंग इग्लिश मेडिअम स्कूलच्या शिक्षिका व आधुनिक काळातील सवित्रीच्या लेकी म्हणजे सारिका कुंभार, पल्लवी चव्हाण व स्नेहल महाडेश्वर होय.

खऱ्या अर्थाने घरामध्ये जर एक महिला शिकली तर अख्खं कुटुंबीय शिक्षित होते. याचाच प्रत्यय या सावित्रीच्या लेकींच्या माध्यमातून आला आहे. गावातील कुंभार परिवारामध्ये जन्मलेल्या सारिका कुंभार ह्या लहानपणापासूनच जिद्दी आणि खूप हुशार होत्या. घरात अठरा विश्व दारिद्र व शिक्षणाचा गंध ही नाही. त्यातच पाच बहिणी व आई-वडील असा संसाराचा गाढा चालवत त्यांच्या वडिलांनी सारिका यांना डी.एड. चे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी १२ वर्षापूर्वी गावात इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अनेक विद्यार्थांना मराठी सोबतच इंग्रजीचे धडे देत संस्कारक्षम अशी पिढी घडवली. त्यानंतर त्यांनी २०२३ मध्ये स्वकर्तृत्वावर स्वतःची ब्लोमिंग बर्ड्स इंग्लिश मीडियम स्कूल ची स्थापना केली.

शिक्षणातून घडवू भविष्य

उज्ज्वल भारताची हीच साधना !

 भीतीला आम्ही हरवू,

 धैर्य आमुच्या श्वासात

स्वप्नांना पंख लावू, उंच भरारी आकाशात !

या कवीच्या काव्यपंक्ती सत्यात उतरत गावातील अनेक मुलांना त्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यात सारिका मॅडम सोबतच पल्लवी चव्हाण मॅडम, स्नेहल महाडेश्वर मॅडम यांनी चांगले परिश्रम घेतले. शाळेच्या माध्यमातून त्यांनी मुलांना व्यवहार ज्ञान कळण्यासाठी आठवडा बाजार, आषाढी पंढरीची वारी,पारंपारिक वेशभूषा,निसर्गाच्या सानिध्यात वनभोजन,स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मुलांच्या उपजत कला गुणांना वाव देणारे छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवणावर आधारित नाटिकाचे सादरीकरण तसेच मुलाचा आत्मविश्वास वाढावा यासाठी भाषण स्पर्धा, यासारखे अनेक चांगले उपक्रम राबवून संस्कारांचे मोती पेरण्याचे काम केले.

तसेच ग्रामीण भागातील शेतकरी व सर्व सामान्य लोकांच्या लेकरांना इंग्रजी माध्यमाच्या स्पर्धत टिकण्यासाठी A.B.C.D पासून कर्स्यु लिपी पर्यंत आवश्यक असणारे सर्व शिक्षण अतिशय सोप्या व साध्या पद्धतीने शिकवून इंग्रजी शिक्षणाचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले. एक वेळ मोठ्या घरातील मुलांचे ऍडमिशन नाही झाले तरी चालेल पण गरिब घराण्यातील होतकरू व हुशार मुलांना आपल्या शाळेत प्रवेश घडवून त्यांना गुणवान व हुशार करण्याची त्यांची तळमळ खऱ्या अर्थाने त्यांच्या शिक्षकीपेशाला शोभणारी आहे. त्यांनी घडवलेली अनेक विद्यार्थी शासनाच्या अंकुर, प्रज्ञाशोध, नवोदय परिषेद राज्यस्तरावर चमकले आहेत. त्यांच्या शाळेची गुणवत्ता दिवसेनदिवस वाढत चालली असून अनेक पालक आपल्या मुलांना त्यांच्या शाळेत प्रवेश घेत आहेत. त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांच्या भावी कार्यास शुभेच्छा !


              शब्दांकन - विकास चौगले

( जनसंपर्क अधिकारी - गुरुदत्त साखर कारखाना, शिरोळ )


थोडे नवीन जरा जुने