आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची माहिती
शिरोळ / शिवार न्यूज नेटवर्क :
शिरोळ तालुक्यातील प्रमुख जिल्हा मार्ग व राज्य मार्गावरील महत्त्वाच्या रस्त्यांच्या सुधारणा, रुंदीकरण व आरसीसी गटर्स बांधकामासाठी सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी नुकत्याच झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मंजूर करून घेतल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. या कामांमुळे तालुक्यातील अनेक गावांमधील दळणवळण अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मंजूर निधीतून प्रमुख राज्य मार्ग क्र. ६ पासून अतिग्रे–कबनूर–इचलकरंजी–टाकवडे–शिरढोण–मजरेवाडी–अकिवाट–टाकळी–खिद्रापूर या मार्गावरील रस्ता सुधारणा, रुंदीकरण तसेच आरसीसी गटर्स बांधकामासाठी सुमारे ११ कोटी ७० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. हा रस्ता परिसरातील वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याने या कामामुळे प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
तसेच चिंचवाडहाळ–शिरोळ–कुरुंदवाड–बस्तवाड–खिद्रापूर या प्रमुख जिल्हा मार्ग क्र. १२३ वर (अकिवाट ते राजापूर भाग) रस्त्याचे रुंदीकरण, सुधारणा व आरसीसी गटर्स बांधकामासाठी ३ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
जयसिंगपूर रेल्वे स्टेशन–उदगाव–चिंचवाड–अर्जुनवाड–घालवाड–शिरटी–शिरोळ या प्रजिमा क्र. १४ रस्त्यावर कि.मी. या दरम्यान रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणासाठी ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने या कामामुळे वाहनचालकांना मोठा फायदा होणार आहे.
याशिवाय टाकळी–टाकळीवाडी–दत्तवाड रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ३८ या भागात रस्त्याची सुधारणा व आरसीसी गटर्स बांधकामासाठी २ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
अब्दुललाट–लाटवाडी–घोसरवाड–दत्तवाड–दानवाड रस्ता जिल्हा मार्ग क्रमांक ३२ येथे आरसीसी गटर्स बांधकामासाठी ३० लाख रुपये तर राज्य मार्ग १६६ पासून जांभळी–टाकवडे–अब्दुललाट या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक १०८ रस्ता सुधारणा करण्यासाठी १ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
तसेच प्रमुख राज्यमार्ग क्रमांक १६६ ते चिपरी–जैनापूर–कोथळी मार्गे जिल्हा हद्द हरीपूर ते राज्यमार्ग क्रमांक १५४ पर्यंत मिळणाऱ्या प्रमुख जिल्हा मार्ग क्रमांक ९३ रस्त्यालगत आरसीसी गटर्स, संरक्षक भिंत, सी.डी. वर्क तसेच रस्त्याची सुधारणा करण्यात येणार आहे.
या सर्व कामांमुळे शिरोळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागांतील दळणवळण अधिक सुलभ होणार असून वाहतूक सुरक्षिततेतही मोठी सुधारणा होणार आहे. दरम्यान, या विकासकामांसाठी निधी मंजूर केल्याबद्दल आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आभार मानले आहेत.
