इसाक नदाफ / शिवार न्यूज नेटवर्क :
दूधगंगा नदीवरून पाणी उपसा करून सिंचनासाठी पाणी वापर करणाऱ्या सर्व बागायतदारांना पाटबंधारे विभागामार्फत पाणीपट्टी भरण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. त्याचबरोबर सर्व थकबाकीदारांना नोटीसीद्वारे सुचित करून घरोघरी जाऊन पाणीपट्टी भरणेबाबत विनंती करणेत आली होती. तरीही पाणीपट्टी भरण्यास शेतकऱ्यांचा प्रतिकूल प्रतिसाद मिळाल्यामुळे आज कोल्हापूर पाटबंधारे विभाग अंतर्गत कागल पाटबंधारे शाखा कागल मार्फत दत्तवाड हद्दीमध्ये दूधगंगा नदीकाठी असलेल्या विद्युत उपसा यंत्र सील करण्यात आले. पाटबंधारे खात्यामार्फत हेक्टरी १३४६ रुपये दराने पाणीपट्टीचे आकारणी करण्यात येते. अत्यल्प पाणीपट्टी असून देखील लोकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने त्याचबरोबर थकीत बागायतदारांना वारंवार नोटीस देऊनही बागायतदारांनी सिंचन पाणीपट्टी भरली नसल्यामुळे विद्युत उपसा यंत्र सील करण्यात आले आले असल्याचे खात्याकडून सांगण्यात आले.
पाटबंधारे खात्यामार्फत बाराही महिने अतिशय व्यवस्थितपणे पाणी परिचलन केले जाते. दूधगंगा धरणापासून दत्तवाड व दानवाड ही गावे 90 किलोमीटर अंतरावर असून देखील बाराही महिने सिंचनासाठी व पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. असे असूनही पाणीपट्टी भरण्याबाबत शेतकऱ्यांचा प्रतिकूल प्रतिसाद असल्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली आहे. दत्तवाड, दानवाड, घोसरवाड या तिन्ही गावातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी आपली थकीत पाणीपट्टीची रक्कम तात्काळ भरून पाटबंधारे खात्यास सहकार्य करावे. असे आवाहन पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आले आहे.
सदरची कारवाई कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) कोल्हापूरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने, दूधगंगा पाटबंधारे उपविभाग निढोरीचे सहाय्यक अभियंता श्रेणी १ प्रशांत कांबळे व कागल पाटबंधारे शाखा कागल चे शाखाधिकारी राजेंद्र आरगे यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी कालवा निरीक्षक स्नेहा निकम, कालवे चौकीदार आनंदा कदम, भरत धोंड, रवी कांबळे त्याचबरोबर पाटबंधारे खात्याचे इतर कर्मचारी उपस्थित होते.
