अनिल जासूद / शिवार न्यूज नेटवर्क :
जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असतानाही समाजमाध्यमांवर पसरलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, 2005 व जीवनावश्यक वस्तू अधिनियम, 1955 अंतर्गत अधिकारांचा वापर करून इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय (पुरवठा शाखा) कडून प्राप्त आदेशानुसार, आता दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त 200 रुपये, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी 2000 रुपये इतक्याच मर्यादेत पेट्रोल किंवा डिझेल देण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारच्या कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्ये इंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका तसेच इतर अत्यावश्यक सेवांशी संबंधित वाहनांना इंधन पुरवठ्यात प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच, प्रत्येक पेट्रोल पंपधारकाने आपल्या पंपावरील उपलब्ध साठा, प्राप्त साठा आणि मागणी केलेल्या साठ्याची माहिती दर्शनी फलकावर प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी येडगे यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, जिल्ह्यात इंधनाचा कोणताही तुटवडा नसून अफवांवर विश्वास ठेवू नये. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळून केवळ गरजेपुरतेच इंधन घ्यावे, जेणेकरून सर्वांना सुरळीत पुरवठा होईल.
सर्व पेट्रोल पंपधारकांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे आवश्यक असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश 25 मार्च 2026 पासून तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून तो 31 मार्च 2026 पर्यंत लागू राहणार आहे.
या निर्णयामुळे इंधन पुरवठा सुरळीत राहण्यास मदत होणार असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
