Top News

बिदरहळी मध्ये सिद्धेश्वर देवाची यात्रा उत्साहात साजरी

 


अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :

        बिदरळ्ळी येथील ग्रामदैवत सिद्धेश्वर देवाच्या यात्रेस 22 मार्च पासून उत्साहात प्रारंभ झाला. 24 रोजी यात्रेचा मुख्य दिवस होता. मुख्य दिवशी इंगळ खेळण्यात आला. यावेळी हर हर महादेव च्या गजर करण्यात आला. यावेळी सुमारे पाच हजारांहून अधिक भाविकांनी आपला नवस पूर्ण केला.

23 रोजी दंडवत, महाभिषेक, बिल्वाचरण अभिषेक, आंबील कलशमिरवणूकसह विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. पहाटे सुमारास सर्व भक्तानी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून स्वच्छ मनाने ओल्या लाकडापासून तयार केलेल्या इंगळात, आपला नवस फेडण्यासाठी खेळले. त्यानंतर विविध आकर्षक फुलांनी सजवलेल्या भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. खारीक व खोबऱ्याची उधळण करीत सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीनंतर उपस्थित सर्वच भक्तांनी सिद्धेश्वर देवाचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

            यावेळी संध्याकाळी ४.३० च्या सुमारास भव्य जंगी कुस्त्या पार पडल्या. यावेळी महाराष्ट्रसह कर्नाटकातील व परिसरातील मल्लांचे सामने झाले. ते पाहण्यासाठी शौकीनांनी गर्दी केली होती. यात्रा सुरळीत पार पडण्यासाठी यात्रा कमिटीने चोख नियोजन केले होते. मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेत पारंपरिक कला, वाद्यांना प्राधान्य देऊन भाविकांनी भारतीय संस्कृती जपली आहे.

थोडे नवीन जरा जुने