अजित कांबळे / शिवार न्यूज नेटवर्क :
बोरगाव ता निपणी येथील पी. एम. श्री सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींनी राज्यपातळीवरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या शाळेत इयत्ता ७ वी मध्ये शिकणारी विद्यार्थिनी कु. दिव्या सचिन रत्नाकर आणि इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी कु. ऐश्वर्या मारुती दुर्गमर्गी या दोन्ही विद्यार्थिनींनी बेंगळुरू येथे संपन्न झालेल्या दिव्यांग मुलांच्या राज्यस्तरीय ५० मीटर धावण्याच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय असे यश संपादन केले.
बोरगाव शाळा सुधारणा समिती व शिक्षक वृद यांच्याकडून सदर विद्यार्थ्याचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष शिवाजी भोरे म्हणाले, आमच्या शाळेतील दिव्यांग विद्यार्थिनीने राज्य पातळीवरील क्रीडा स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणे ही आमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण शाळा, गाव आणि पालकवर्गाचा मान उंचावली आहे.मर्यादा शरीराच्या असतात, मनाच्या नाहीत याचा प्रत्यय त्यांनी आपल्या जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर दिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतही खचून न जाता सातत्याने परिश्रम घेतल्यामुळेच आज या मुली राष्ट्रीय स्तरावर झेप घेण्यास सिद्ध झाल्या आहेत. त्यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही, राष्ट्रीय स्पर्धेतही र्या उज्ज्वल यश संपादन करून आपल्या शाळेचा, गावाचा आणि राज्याचा गौरव वाढवेल, असा मला पूर्ण विश्वास असल्याचे सांगितले.
त्यांच्या या यशामागे या विद्यार्थिनींचे प्रयत्न, जिद्द आणि आत्मविश्वास आहेच; याशिवाय शाळेचे क्रीडाशिक्षक श्री. डी. टी. हगडे यांचे मार्गदर्शन तसेच पी. एम. श्री मराठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. आर. एम. पकाले, शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी भोरे, समितीचे सर्व सदस्य, शाळेतील सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन लाभले. तसेच या विद्यार्थिनींचे पालक श्री. सचिन रत्नाकरआणि श्री. मारुती दूर्गमर्गी यांचे मोलाचे सहकार्य या विद्यार्थिनींच्या यशामागे आहे.
या विद्यार्थिनींचे माननीय गट क्षेत्रशिक्षणाधिकारी श्रीमती महादेवी नाईक, बोरगाव क्लस्टरचे सी. आर. पी. श्री. राजू कोकणे, तालुका क्रीडाधिकारी श्री. पाटील सर तसेच शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष श्री. शिवाजी भोरे, उपाध्यक्ष स्वाती शिंगे तसेच सर्व सदस्य यांनी तसेच बोरगाव येथील नागरिक आणि पालकांनी विशेष कौतुक आणि प्रशंसा केली.
