शिरोली / शिवार न्यूज नेटवर्क :
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) पुलाची शिरोली येथे सापळा रचून गांजा विक्री करणाऱ्या एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून सुमारे ४ किलो १२० ग्रॅम गांजा, दुचाकी व मोबाईल असा एकूण १ लाख ५४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ करण्यात आली.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव उमरअली इस्माईल पटेल (वय ३१, रा. पुलाची शिरोली) असे आहे. पोलिस अंमलदार सचिन जाधव व अनिकेत मोरे यांना खबऱ्याकडून खात्रीशीर माहिती मिळाली होती की, एक व्यक्ती मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी पाण्याच्या टाकीजवळ येणार आहे. मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित उमरअली पटेल घटनास्थळी येताच त्याला ताब्यात घेण्यात आले. झडतीदरम्यान त्याच्याकडे ४ किलो १२० ग्रॅम गांजा आढळून आला.पोलिसांनी तत्काळ गांजासह त्याची दुचाकी व मोबाईल जप्त केला. प्राथमिक चौकशीत आरोपीने शिरोली एमआयडीसी परिसरात चोरून गांजा विक्री करत असल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक योगेश कुमार, मा. अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार शिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व त्यांच्या पथकाने केली.दरम्यान, गेल्या आठ दिवसांत एलसीबीने शिरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुसऱ्यांदा मोठी कारवाई केल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत जनसामान्यातून प्रश्न उपस्थित होत आहेत.
